मुंबई : सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये, ठाणे, नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि बदलापूरमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली तर अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाडसह मुंबई उपनगरातील सर्व भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. नवी मुंबईसह पनवेल आणि रायगडमध्येही तुफान पाऊस सुरू आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या २-३ तासामध्ये मुंबई आणि ठाण्यात मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर कोकणसह पश्चिम किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून काही भागांत आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसाार, राज्यात पुढचे ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिल्ली पाण्याखाली
यमुनेच्या पाण्याच्या पातळीत विक्रमी वाढ झाल्याने दिल्लीकरांच्या अडचणीत भर पडली आहे. मुसळधार पावसानंतर दिल्लीत यमुना धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. नदीचा प्रवाह कायम आहे. यमुनेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने अनेक भागात बिकट परिस्थिती झाली आहे. सखल भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. मुसळधार पाऊस आणि यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाजवळ पाणी साचल्याचे दिसून आले. तसेच राजघाटाजवळ पाणी साचले आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांत उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागात ‘मुसळधार पाऊस’ होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. याचपार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन करुन दिल्लीतील परिस्थितीबाबत माहिती घेतली.
नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना फोन करुन दिल्लीतील पूरस्थितीबद्दल चर्चा केली. अमित शाहा यांनी त्यांना परिस्थितीची माहिती दिली आहे. यमुना नदीची पाणी पातळी कमी होण्याचा अंदाज असल्याचे अमित शाह यांनी नरेंद्र मोदींना सांगितले. तसेच परिस्थिती सुधारण्याची शक्यता असल्याचेही शाह म्हणाले