आजपासून अवजड वाहनांना ‘या’ घाटातून बंदी

तरुण भारत लाईव्ह : औरंगाबाद खंडपीठाने कन्नड (औट्रम) घाटातील अवजड वाहतुक ११ ऑगस्ट पासून बंद करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाच्या अंमलबजावणीची तयारी पोलिस प्रशासनाकडून केली असून आजपासून घाटातील अजवड वाहतुक बंद होवून न्यायालयाने सुचवलेल्या मार्गावरून वळवण्यात येणार आहे. याबाबत सकाळी महामार्ग पोलिसांनी कन्नड घाटात अवजड वाहतुक करणाऱ्या ट्रकचालकांची बैठक घेऊन न्यायालयाच्या निर्णयाची माहिती दिली.

न्यायालयाने जड वाहने, मल्टीएक्सल व्हेइकल, हेवी ट्रक, पेट्रोल, डिझेल, एलपीजी वाहून नेणारे टँकर, लक्झरी खासगी बस आदींना बंदी घातली. केवळ आणीबाणीची परिस्थितीत परवानगी घेऊन सैन्य, निमलष्करी दल, पोलिस दलाची वाहने जातील.

याबाबत महामार्गाचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, उपअधीक्षक प्रदीप नैराळे, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी न्यायालयाच्या आदेशाचे अंमलबजावणीच्या दृष्टीने आढावा घेतला व सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीष पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना सूचना दिल्या. अपर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस व शहर वाहतूक शाखेने नियोजन केले आहे.