लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. अशातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची घटना महाडमध्ये सकाळी 9.30 वाजता घडली. या अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले असून, पायलट सुखरूप आहेत. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे ?
त्या म्हणाल्या की, सकाळी एका प्रचारसाठी जाणार होतो. दिवसभरात दोन-तीन सभा होत्या. रात्रीची महाडची सभा करुन आम्ही रात्री येथे थांबलो होतो. हेलिपॅडवर आलो तेव्हा हेलिकॉप्टर घिरट्या मारत होतं. अचानक ते कोसळलं. मी आणि माझा भाऊ हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते. पण, सुदैवाने आम्हाला काहीही झालं नाही. आम्ही सुखरुप आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुषमा अंधारे सकाळी 9.30 वाजता बारामतीच्या दिशेने जाणार होत्या. बारामतीत आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाडहून जाणार होत्या. त्यासाठी त्या हेलिपॅडवर पोहोचल्या. मात्र, सुषमा अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते क्रॅश झाले. या अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. सुदैवाने हेलिकॉप्टरचा पायलट सुखरुप आहे. स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.