PM मोदींकडून लोकमान्यांच्या कार्याला उजाळा, वाचा काय म्हणाले आहे?

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये बोलतांना नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याला उजाळा दिला.

काय म्हणाले आहे PM मोदी?
लोकमान्य टिळक आपल्या माथ्याचे टिळक आहेत. पुण्याच्या धर्तीवर येण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्य आहे. ही पुण्यभूमी छत्रपती शिवाजी महाराज, चाफेकर बंधूंची पवित्र धरती आहे. तसेच ती ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची आदर्श भूमी आहे.

पुढे बोलतांना मोदी म्हणाले, दगडूशेठ पहिले व्यक्ती होते ज्यांनी टिळकांच्या आवाहनानंतर सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळणं, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, मी हृदयातून आभार व्यक्त करतो.

काशी आणि पुणे या शहरांची देशात विशेष ओळख आहे. विद्वत्ता इथं चिरंजीवि आणि अमरत्वाला प्राप्त झालेली आहे. या भूमीमध्ये माझा सन्मान होणं माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.
मोदी पुढे म्हणाले की, जेव्हा कुठला पुरस्कार मिळतो, तेव्हा एक जबाबदारी येते. हा पुरस्कार मी १४० कोटी देशवासियांना समर्पित करतो. देशवासियांच्या सेवेत, अपेक्षांमध्ये कोणतीही कसर मी सोडणार नाही.

लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची पूर्ण दिशाच बदलली होती. जेव्हा इंग्रजांनी भारत सोडून जाण्याची तयारी दर्शवली नव्हती तेव्हा टिळकांनी ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ असं म्हटलं होतं. टिळकांचं स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान असल्यामुळे इंग्रजांना देश सोडून जावं लागलं. खुद्द महात्मा गांधी यांनी टिळकांना आधुनिक भारताचं महानायक म्हटलं होतं.

पंतप्रधान बोलतांना पुढे म्हणाले, अनेक संस्था टिळकांनी सुरु केल्या आणि परंपरादेखील सुरु केल्या. सार्वजनिक गणपती महोत्सव सुरु केलाच तसेच त्यांनी गणेशोत्सवाबरोबच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरु केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला उजाळा देण्यासाठी त्यांनी शिवजयंती सुरु केल्याचं मोदींनी सांगितलं.