शाश्वत सुखाचा राजमार्ग

 

प्रासंगिक

मंगेश जोशी

मराठी माणसाच्या भाग्ययोगापैकी एक गोष्ट आहे, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज.tukaram maharaj फाल्गुन वद्य द्वितीया ही तिथी महाराष्ट्रात ‘तुकाराम बीज’ म्हणून जाणली जाते.

या दिवशी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे tukaram maharaj ‘वैकुंठ गमन’ झाले. वारकरी पंथामध्ये संत श्री ज्ञानेश्वर माउलींच्या ‘संजीवन समाधी’ सोहळ्याला जेवढे महत्त्व आहे, तितकेच संत श्री तुकाराम महाराजांचे ‘वैकुंठ गमन’ सोहळ्यालाही आहे. संत बहिणाबाईंनी तर भागवत धर्मावर इमारतीचे रूपक करताना ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ व ‘तुका झालासे कळस’ असे म्हणून मराठी मनातील या दोन्ही महापुरुषांविषयीचे भाव अधोरखित केले आहे. ‘ग्यानबा-तुकाराम’ हा एक प्रकारे वारकरी भक्तांचा श्वास-प्रश्वास आहे.

आचार्य विनोबा भावे म्हणत की, ‘ज्ञानदेव तुकाराम म्हणजे ग्यानबा तुकाराम. हा मध्यमपदलोपी समास आहे. ही दोन नावे घेतली की, त्यामध्ये महाराष्ट्रातील भागवत संप्रदायातील सारी संत मंडळी अध्याहृत आहेत.’ सर्व संतांच्या स्मरणाचे पुण्य ही दोन नावे घेतली की प्राप्त होते. असे असले तरी संत तुकाराम tukaram maharaj हे सर्वसामान्य माणसांसाठी अधिक जवळचे आहेत. श्री ज्ञानेश्वर माउली यांचे जीवन अलौकिक आहे. जन्मत: ते अवतारी पुरुष वाटतात. पण तुकाराम महाराजांचे जीवन सामान्य माणसाला आपल्यासारखे वाटते. कारण ते कुटुंबवत्सल आहेत. त्यांनी आपल्या उण्यापुऱ्या चार दशकांचे आयुष्यात सामान्य माणसाप्रमाणे संपत्ती आणि आप्त यांचे संयोग व वियोग सहन केले. लहानपणी श्रीमंती भोगली; नंतर पराकाष्ठेचे दारिद्र्य, विपत्ती सहन केली. आई-वडिलांचा अकाली मृत्यू, भावाचा व प्रथम पत्नीचा वियोग, दुसरी पत्नी प्रेमळ पण कर्कशा, गावातील कर्मठ लोकांचा विरोध सारे सहन केले व त्यातून त्यांचे संतत्व सिद्ध झाले. ‘तुका म्हणे तोचि संत, सोशी जगाचे आघात’ तुकारामांचे tukaram maharaj अभंग हा मराठी भाषेतील अनमोल ठेवा तर आहेच, पण सामान्य माणसाच्या उद्धाराची ती गुरुकिल्लीसुद्धा आहे. ‘नर करणी करे तो नर का नारायण हो जाये’ याचा तो एक वस्तुपाठ आहे.

गीतेत ‘उद्धरेत् आत्मनो आत्मानम्’ (स्वतःच स्वतःचा उद्धार करावा) असे म्हटले आहे. संत तुकाराम tukaram maharaj हे त्याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. तुकारामांच्या या आत्मोद्धाराच्या सोपानात, सामान्य मनुष्य जीवन ही पहिली पायरी आहे तर ‘सदेह वैकुंठ गमनाचा सोहळा’ आणि त्यासाठी स्वत: पांडुरंगाने विमान घेऊन येणे ही अंतिम पायरी आहे. यात आपण ‘वैकुंठवासी’ आहोत व या जगात, ‘बोलले जे ऋषी, साच व्हावे वर्ताया’ आलो आहोत ही जाणीव महत्त्वाची आहे. या जाणिवेनेच संत तुकारामांचे जीवन बदलले आहे. त्यांची तीव्र व कठोर साधना, हा सोपान चढण्याचा त्यांचा पुरुषार्थ आहे. त्याची परिणती ‘आनंदाचा ठाव झाला माझे चित्ती, सागर तो किती उपमेसी’ या अभिव्यक्तीत झाली आहे. वस्तुतः ‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे’ या अभंगात ‘काय सांगू झाले, काहीचिया बाही, पुढे चाली नाही, आवडीने’ असे त्यांनी म्हटले, तेव्हा त्यांचे जवळ लौकिक आनंदाच्या, सामान्य माणसाला ओढ असणाऱ्या कोणत्या गोष्टी होत्या? त्यांचे जवळ राजकीय सत्ता नव्हती, संपत्ती उरली नव्हती, बाई पतिव्रता होती, प्रेमळ होती पण कर्कशा होती. नवऱ्याच्या या देवतुल्य योग्यतेची तिला जाणीव व तमा नव्हती. ती एक सामान्य संसारी स्त्री होती. चार मुले जन्माला घातली, ती सुखाने जगवावीत, किमान त्यांचे पोटात रोज चार घास जावेत अशी तिची माफक अपेक्षा होती. गावात मोजक्या माणसांना तुकारामांचे संतत्व माहीत व मान्य होते. काही तर त्यांचा दुस्वासच करीत. अशा परिस्थितीत कशाचा आनंद तुकाराम tukaram maharaj मानत व म्हणत होते? तर ‘आनंदाचा कंद हरी हा’ त्यांना सापडला होता. ‘सुखाचे ते सुख, श्रीहरी मुख’ हा शोध त्यांना लागला. जगाच्या आवरणरूपी धुळीने झाकलेले ‘श्रीहरी रूप’ रत्न त्यांना गवसले होते व ‘सेवितो हा रस सेवितो हा रस, वाटितो अनेका’ या भूमिकेतून, अत्यंत उदारपणे ते या आनंद रसाची उधळण करीत होते.

मराठी माणसाने व माणसाने ‘तुकाराम बीज’ साजरी करीत असताना खऱ्या सुखाचे जे बीज तुमच्या माझ्या हाती दिले आहे ते जपण्याची व रुजविण्याची, त्यासाठी आपल्या मनाची भूमी आणि भूमिका तयार करण्याची भक्तिभावाचे त्याला सिंचन करण्याची आणि त्या सुखांकुराचा विशाल वटवृक्ष करण्याची आवश्यकता आहे. श्री तुकाराम बीजेचे दिवशी तुकारामांचे tukaram maharaj स्मरण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या मार्गाने चालणे आहे. जी वाट जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी खडतर साधना करून आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी स्वत: चालून मळून ठेवली आहे, तोच खरा सुखाचा राजमार्ग आहे. त्या मार्गाने अखंड चालत राहणे ही संत तुकारामांची tukaram maharaj पूजा आहे. तुकाराम बीजेच्या दिवशी त्यांना खरी श्रद्धांजली आहे.