हिंदुत्व : स्वातंत्र्यपूर्व स्थिती !

इतस्तत:

– डॉ. विवेक राजे

हिंदुत्व म्हणजे ‘सर्वंकष हिंदू समाज’, हिंदू राष्ट्र विचार हे आपण मागील लेखात पाहिले. या हिंदू विचारांची स्वातंत्र्यपूर्व काळात काय स्थिती होती, यावर अनेक मतेमतांतर असणारच आहेत.या विचारांच्या स्थितीवर थेट विचार फारसे कोणी मांडलेले नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळाचा विचार करायचा तर १८१० नंतरचा, म्हणजे दुस-या बाजीरावांचा पराभव झाल्यानंतरचा कालावधी घ्यावा लागतो. या काळात अस्थिरता होती आणि इंग्रजी राजवटीद्वारे एतद्देशियांचे शोषण केले जात होते. गुरुकुल शिक्षण पद्धती बंद पाडण्यासाठी कंपनी सरकार प्रयत्नशील होते. एकूणच या प्रदेशातील, देशातील सगळे विचार, सगळे ज्ञान हे टाकाऊ, कुचकामी असेच वातावरण इंग्रजी सत्तेने निर्माण केले होते. इंग्रज आणि ख्रिश्चन मिशन-यांना भारतीय आणि हिंदू विचारधारा बदनाम करायच्या होत्या. त्यामुळे तुमची शिक्षण पद्धती उद्ध्वस्त करून विविध प्रथा-परंपरांना बदनाम करण्याची आघाडी ख्रिश्चन मिशन-यांद्वारे उघडण्यात आली. कुठेतरी क्वचित सती जाण्याची आढळणारी पद्धती सार्वत्रिक म्हणून बदनाम करून कायद्याने बंद करण्यात आली. यासाठी भारावलेल्या किंवा सत्ताधार्जिण्या भारतीय विचारवंतांचा वापर करण्यात आला. या प्रदेशात कोणालाही जबरदस्तीने सती जावे लागत नव्हते वा देवदासी होण्यास भाग पाडले जात नव्हते, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

एतद्देशीय विचार, प्रथा, परंपरा, उपासना पद्धती कुचकामी, प्रतिगामी, अवैज्ञानिक असल्याचा दावा ख्रिश्चन मिशनरी करीत असत. हे सगळे करण्यामागे निश्चित अशी आखणी होती. कारण, १७ व्या शतकात भारतात आलेल्या पाश्चात्त्य लोकांनी काही वेगळे विचार आणि अनुभव नोंदविले आहेत. १७४४ ते १७७१ पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीत काम केलेल्या जॉन ग्रॉस याने आपल्या ‘अ व्हॉयेज टु दी ईस्ट इंडीज’ या ग्रंथात हिंदूंची आपल्या धर्म व परंपरा याविषयीची चिवट श्रद्धा आणि इतर धर्मांविषयी असलेल्या सहिष्णुतेबद्दल आदर नोंदविला आहे. आपला धर्म हाच अखिल मानव जातीला एकमेव तारणहार धर्म आहे आणि त्यामुळे जगातील सर्व माणसांना काहीही करून आपल्या धर्मात आणलेच पाहिजे, हे सांगणा-या एकेश्वरवादी धर्मांपेक्षा हा वेगळा व अधिक उदार दृष्टिकोन त्यांच्या मनात कुतूहल आणि आदर निर्माण करून गेला. १८ व्या शतकात मात्र या संपूर्ण प्रदेशांवर नियंत्रण प्राप्त होताच ख्रिश्चन मिशनरी व सत्ताधारी इंग्रज यांचा पवित्रा बदललेला दिसतो. १८५७ च्या बंडानंतर कंपनी सरकारकडून सत्ता इंग्रज सरकारकडे गेली. अनेक बदल घडवून आणले गेले. इंग्रजी भाषा शिकलेले अनेक हिंदू प्रशासनात महत्त्वपूर्ण जागी दिसू लागले. मुस्लिम समाज या बाबतीत माघारलेला दिसू लागला.

त्यामुळे सय्यद अहमद खान यांच्यासारखे काही मुसलमान, मुस्लिम मुलांनी इंग्रजी शिक्षण घेऊन ब्रिटिश प्रशासनात जागा पटकाव्या म्हणून प्रयत्न करू लागले. सामाजिक पातळीवर वेगळी चूल मांडून काही सवलती व सत्तेत काही वाटा मिळविण्यासाठी धडपडू लागले. यातूनच उर्दू विरुद्ध हिंदी हे एक आंदोलन घडून आले. मुसलमानांना वेगळी ओळख मिळविण्यासाठी सय्यद अहमद खान यांच्यासारखे मुस्लिम प्रयत्नशील झाले. एका बाजूने ख्रिश्चन मिशनरी तर दुसरीकडे मुस्लिम लोक हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करू लागले. ब्रिटिश सरकार सर्वसाधारणपणे धार्मिक बाबीत श्रद्धा, प्रथा परंपरा यात हस्तक्षेप टाळत होते. मुस्लिम समाज मात्र आधीपासूनच आपली वेगळी ओळख निर्माण करून प्रदेशातील संसाधनांचा बरोबरीचा वाटा मिळविण्यासाठी प्रयत्नरत होता. इथली जमीन बळकवायची, संसाधने हडप करायची, जमेल तितके हिंदूंचे धर्मांतर करायचे हीच नीती होती. इंग्रजी राजवटीत याचे पहिले दृश्यपरिणाम बंगालच्या फाळणीच्या वेळी दिसून आले. पण तरीही या सगळ्या विरोधात रोखठोक पवित्रा हिंदू समाजाने घेतलेला आढळत नाही. उलटपक्षी हिंदू समाज आपण एकत्र येऊन राजकीय सुधारणा करण्यासाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे, याच मताचा होता. यासाठीच लोकमान्य टिळकांनी लखनौ करार (१९१६) केला. पण मुस्लिम समाजाला मात्र यातूनच आपण काय मिळवू शकतो, याची जाणीवदेखील लखनौ करारानेच मिळाली.

या लखनौ कराराला विरोध करणारे एकमेव नेते म्हणजे डॉ. मुंजे होत. सगळ्या सभा मंडपात टिळकांच्या अतिशय जवळचे असूनही स्पष्टपणे लखनौ कराराला डॉ. मुंजेंनी विरोध केला. काँग्रेस तिच्या स्थापनेपासून हिंदूंचा पक्ष होता. बहुतेक मुस्लिम नेते काँग्रेसपासून फटकूनच होते तर काँग्रेसमध्ये जहाल-मवाळ वाद हाच महत्त्वाचा होता. जहाल म्हणजे राष्ट्रवादी तर मवाळ म्हणजे ब्रिटिश शासनांतर्गत काही सवलती व अधिकार मागणारे, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. १९२० नंतर गांधी युग सुरू झाले. अqहसेचे अतिरिक्त स्तोम भारतीय समाजात गांधीजी आणू पाहात होते; पण अनेक ठिकाणी हिंसा होतंच होती. त्यात हिंदू-मुस्लिम दंगली अधूनमधून उफाळत असत. गोलमेज परिषदेने स्वातंत्र्य जवळ आल्याची जाणीव अनेक नेत्यांना झाली. काही, सत्तेत आपल्याला काय मिळेल, याचा विचार करू लागले तर काही, मिळणारे स्वातंत्र्य दीर्घकाळ कसे टिकवता येईल, याचा विचार करू लागले. गांधीजींच्या काँग्रेसने मुस्लिम अनुनयाचे शिखर गाठले. नागपूरमध्ये डॉ. मुंजे, डॉ. खरे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू मुसलमानांना जशास तसे उत्तर देत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेत होते.

काँग्रेसच्या मुस्लिमधार्जिण्या धोरणाला शह देणे आवश्यक झाले होते. या पृष्ठभूमीवर हिंदू महासभेची स्थापना झाली. हिंदू हिताचा विचार या देशात प्रकटपणाने मांडला जाऊ लागला. १९२५ मधे डॉ. हेडगेवारांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघाचे उद्दिष्ट या देशातील समस्त हिंदू समाजाला संघटित करणे हेच होते. राष्ट्रीय चारित्र्य निर्माण, देशाची अखंडता, qहदू सशक्तीकरण, जातीविरहित एकसंध हिंदू समाजाची निर्मितीची मुहूर्तमेढ नागपुरात रोवली गेली. संघाची उद्दिष्ट्ये तेव्हाही राष्ट्र या संकल्पनेवरच आधारित होती, आजही तशीच आहेत. तेव्हाही अतिशय अवघड होती, आजही अवघडच आहेत. फरक इतकाच, आज वयाची शंभरी गाठताना संघाच्या हिंदुत्व विचारांना समाजमान्यता मिळाली आहे. सगळा भारतीय समाज (यात मुस्लिम व ख्रिश्चन धर्मातील एक मोठा लोक समूह सामील आहे.) संघाकडे आदराने आणि आश्वस्तपणाने पाहतो आहे. परंतु, भारतीय समाजमनाला तेव्हा गांधीजींनी गारुड घातले होते. सगळ्या भारतीय समाजाचे आपणच एकमेव तारणहार- मसिहा आहोत. मुस्लिम समाज स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आणि नंतरदेखील बरोबर असणे गरजेचे आहे, हे धोरण गांधीजी आणि म्हणून काँग्रेस ठेवले होते.

१९३० ला मुहम्मद इक्बालने सर्वप्रथम मुसलमानांसाठी स्वतंत्र देशाची मागणी केली. १९४० मध्ये जिनांनी मुस्लिम लीगच्या व्यासपीठावर वेगळ्या स्वतंत्र देशाच्या मागणीचा उच्चार केला. याला कुठेही काँग्रेस योग्य त्या पद्धतीने उत्तर देत नव्हती. काँग्रेस बहुसंख्येने असलेल्या हिंदूंच्या आस्था, भावनांपेक्षा देशातील इतर समाजांना अतिरेकी महत्त्व व संरक्षण देत होती. मुस्लिम लांगूलचालन करण्यात कोणतीही कसर काँग्रेस नेतृत्व आणि पर्यायाने गांधीजी सोडत नव्हते. १९४६ मध्ये स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीसाठी जिनांनी ‘डायरेक्ट एक्शन डे’ म्हणून १६ ऑगस्ट जाहीर केला. देशात प्रचंड साचार आणि दंगली घडवून आणल्या गेल्या. पण काँग्रेस नेतृत्व आणि गांधीजी, मुस्लिम लीग व जिना यांची मनधरणी करत राहिले.या सगळ्याच्या ब-याच आधीपासून गांधीजी व काँग्रेस यांची ही मुस्लिमधार्जिणी वागणूक मान्य नसणा-या हिंदू नेत्यांनी आपल्या अनुयायांसह वेगळी चूल मांडली असली, तरी गांधीजींचा लोकमनावर असलेला प्रभाव तसेच हिंदुत्व विचारांचे सामाजिक व राजकीय वय, यामुळे हिंदुत्व विचारांना फारसा राजकीय व सामाजिक पाठींबा स्वातंत्र्यपूर्व काळात नव्हता, हे निश्चित !

९८८१२४२२२४