विनय जोशी
हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी विचारसरणी पुढे नेणाऱ्या शेकडो संघटना आणि लाखो कार्यकर्ते भारतभर सक्रिय आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संबंधित संघटना, संस्था हिंदुत्व- राष्ट्रवाद या क्षेत्रात सर्वात अग्रणी असल्या आणि त्यांचं जाळं, दल बल आणि शक्ती हि अफाट असली तरी फक्त आपणच यासाठी काम करतो असा त्यांचा दावा कधीही नव्हता आणि नसेल (एखाद्या संघ कार्यकर्त्याने तसा दावा केलाच तर ते त्याचं अज्ञान समजण्यास हरकत नाही).
संघाबाहेर हिंदुत्व, हिंदू धर्म आणि राष्ट्रवाद जोपासणारे कित्येक कार्यकर्ते, साधू संत, महंत, व्याख्याते, कथा- कीर्तनकार, संशोधक, अभ्यासक, लेखक लाखोंच्या संख्येने भारतभर पसरलेले आहेत आणि त्यांच्यापैकी अनेकांना हे काम फक्त आपणच करतो बाकी सगळे दुय्यम आहेत असं वाटण्याचा संभव आहे तरीही त्यांच्या कामाबद्दल आपण आदर बाळगला पाहिजे. तर मग मुद्दा काय आहे? तर मध्येच डोकं वर काढणारा अभिनिवेश आणि अहंकार!
माझा त्यागाचा अहंकार!
मी मुर्डी सारख्या कोकणातल्या लहानशा गावात लहानाचा मोठा झालो आणि शिक्षण दापोलीत झालं. माझ्या घरात माझ्या आधी माझे वडील आणि धाकटा काका संघ प्रचारक होते आणि घरी नेहमी संघ कार्यकर्ते प्रचारक, अन्य संघटनांचे कार्यकर्ते येऊन, जेऊन, राहून जात असत. त्यामुळे माझ्या मनात एक सुप्त अहंकार होता कि संघ कामासाठी आपल्या कुटुंबाचं योगदान जगात सगळ्यात जास्त आहे. पुढे दापोलीत शिकत असताना आणि संघकामात अजून मोठ्या जबाबदाऱ्या येत असताना हा अहंकार वाढत गेला (अर्थात कधीही प्रकट झाला नाही). मग बीएससी पूर्ण करून वयाच्या बाविसाव्या वर्षी प्रचारक निघालो तेव्हा मनातला त्यागाचा अहंकार अजून दोन तुरे लावून वर आला- आपण आता एकाच कुटुंबातला तिसरा प्रचारक आहोत आणि ते हि बीएससी पूर्ण करून निघालोय…
गोव्यातल्या केपे, कुडचडे आणि बोरकोना, मेघालय मधील अनुभव…
हिंदुत्वासाठी आपल्या कौटुंबिक योगदानाच्या सुप्त अहंकाराचं एक अदृश्य ओझं घेऊन मी दक्षिण गोव्यात केपे- कुडचडे येथे तालुका प्रचारक म्हणून गेलो. तिथे माझे स्थानिक पालक होते सत्यवान नाईक. ते मूळचे सांग्याचे पण नोकरी निमित्त कुडचड्यात राहायचे. यांच्या घरी सकाळच्या पहिल्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सांगे तालुक्यातून कित्येक संघ कार्यकर्ते रोज यायचे, चहा, न्याहारी, जेवण यापैकी जे काही असेल ते वाहिनी अत्यंत हसतमुखाने आणि आग्रहाने त्यांना वाढायच्या, गप्पा टप्पा, हास्य विनोद, व्यक्तिगत अडचणी यावर सत्यवान भाईंजवळ मन मोकळं करून हे कार्यकर्ते निघून जायचे. मला सत्यवान भाईंच्या घरी कधीही मी एकटा जेवलेला आठवत नाही इतकी अफाट वर्दळ घरी असायची. येणारे कार्यकर्ते भाईंना आणि वहिनींना आठवणीने काहीना काही सोबत घेऊन येणार आणि वाहिनी त्यांना काहीना काही खाऊ पिऊ घालूनच परत पाठवणार. केपे तालुक्यात सगळीकडे फिरताना गावागावात कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती होती. माझ्या कौटुंबिक त्यागाच्या सुप्त अहंकाराला नष्ट करणारा हा पहिला अनुभव होता.
बोरकोना- गारो हिल्स मेघालय…
वर्षभराने माझी बदली गोव्यातून गारो हिल्स, मेघालयात झाली. आपण धोकादायक परिस्थिती असलेल्या मेघालय- आसाममध्ये मोठा त्याग आणि धाडस करून आलोय, नुकतेच त्रिपुरा मध्ये चार संघ प्रचारक अतिरेक्यांनी अपहरण करून मारलेत आणि तरीही आपण आलोय असा एक थोडा अहंकार मनात डोकं वर काढत असतानाच मला माझ्या आधी ५- १० वर्ष पोचलेले सुरेंद्र जी तालखेडकर, रमेश जी देसाई, सुमंत जीआमशेकर, अतुल राव जोग, चंद्रशेखर (चंदू जी) देशपांडे, उल्हास जी कुलकर्णी, राजेश जी देशकर, प्रशांत महामुनी हे मराठी प्रचारक, प्रदीपन, अशोकन, रामसिंग असे केरळ, कर्नाटक, उत्तराखंड इथून आलेले आणि मनाने, भावनेने, व्यवहाराने स्थायिक झालेले प्रचारक दिसले. त्यांच्या तिथे असण्याने माझा नवा विकसित होऊ पाहत असलेला अहंकार तिथेच विरला!
गारो हिल्सच्या संघकामाचं मुख्यालय तुरा- मानकाचार रस्त्यावर बोरकोना काली आश्रमात होतं. बाजूला कुमारपारा हि वस्ती आहे. इथे अनिमेश कोच राहतात. ते तेव्हा जिल्हा कार्यवाह होते. अनिमेश दा स्वतः शिक्षक आणि परिवार शेतकरी होता. यांच्या घरात संघ आणि अन्य सर्व संघटनांच्या कार्यकर्त्यांची इतकी प्रचंड वर्दळ असायची कि कुणीही कार्यकर्ता तिथे आला कि एक खोली उघडली जायची आणि चहा, भात याची तयारी होऊन जायची. इथली वर्दळ बघून माझा उरलासुरला त्यागाचा अहंकार संपून गेला.
गारो हिल्स मध्ये तेव्हा स्थानिक आतंकवादी गट शिवाय आसामच्या उल्फा अतिरेकी संघटनेचे अतिरेकी सक्रिय असायचे. बोरकोना गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या इकडे मेघालय आणि पलीकडे आसामचा धुबडी जिल्हा. त्यामुळे आर्मीने आसामच्या बाजूला दाब दिला कि उल्फा वाले मेघालयात यायचे. कित्येक वेळा संघ प्रचारक आणि उल्फा वाले एकाच वेळी गावात असायचे पण समोरासमोर येणं दोघेही टाळायचे. उल्फाचा संघाला विरोध होताच आणि काही प्रचारक त्यांनी मारलेही होते. या स्थितीत स्थानिक हिंदूंनी संघकाम करणं आणि तेही उघडपणे याला किती मनोधर्य लागत असेल याची कल्पनाच केलेली बरी.
अख्ख्या गारो हिल्स मध्ये ख्रिश्चन दमनचक्राला झुगारून अल्पसंख्य हिंदूंनी उजळ माथ्याने संघकाम करणं हि किती मोठी बाब असेल याची कल्पना करू! गारो हिल्स- आसामच्या उत्तर सीमेवर बेसरकोना, टिकरीकीला, बामुनडांगा ते हल्दीबारी, बाबेतपारा, बोरकोना, आमपाती, बेटासिंग, कुमली, भैराकोपी, झिकजॅक, पुराखासिया, डालू बारेंगापारा अशा प्रचंड पसरलेल्या पट्ट्यात ख्रिश्चन दहशतवाद आणि उल्फा यांच्या कात्रीत राहून स्वखुशीने, आनंदाने हिंदू धर्मासाठी म्हणून संघकाम करायचं हि अद्भुत आणि मोठी गोष्ट आहे.
या दोन ठिकाणी राहून माझ्या मनातला “त्यागाचा” सुप्त अहंकार दूर पळाला. देशभर अशी लाखो घरे, कुटुंब, व्यक्ती आहेत ज्यांनी राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी विचारांसाठी कण कण आणि क्षण क्षण त्याग वर्षानुवर्षे केलेला आहे. त्याचा त्यांनी प्रचार केला नाही किंवा उल्लेखही केला नाही. तो त्याग त्यांनी मिरवला नाही कि त्याचा वैयक्तिक फायदा उठवला नाही.
सोशल मीडियाची दुनिया…
सोशल मीडियावर हिंदुत्व- राष्ट्रवाद यासाठी जीवाचं रान करून अभ्यासपूर्ण लिखाण करणारे खूप जण आहेत. इथे त्याची लोकप्रियता लाईक्स, शेयर्स आणि कॉमेंट च्या संख्येत मोजली जाते. बघता बघता लेखकाला एक वलय प्राप्त होतं आणि त्यातून खलील जिब्रानच्या कोल्ह्याचा जन्म होतो. मग हिंदुत्व- राष्ट्रवाद यासाठी आपलंच योगदान सर्वाधिक आहे आणि बाकीच्यांचं हिंदुत्व- राष्ट्रवाद हा बेगडी, घाबरट आणि खोटा आहे हे सांगण्याची अहमअहमिका सुरु होते.
संघाची उणीदुणी..
या संघर्षातून हिंदुत्व- राष्ट्रवाद याबाबतीत आपण कसे संघाच्या चार पावलं पुढे आहोत हे सांगण्याची गरज भासते. मी मोठा आहे हे सांगताना तो अमुक कीर्तनकार कितीही उत्तम वक्ता असला, अभ्यासपूर्ण बोलत असला तरी तो कसा व्यभिचारी आहे हे सांगितलं जातं. संघ आता मुस्लिमांच्या अनुनयात गुरफटला गेलाय, संघ हिंदूंचं नुकसान करत आहे वगैरे “अभ्यासपूर्ण” सिद्धांत मांडले जातात. संघ-भाजपच्या राज्यात अफाट धर्मांतरं होतंय हे सांगितलं जातं पण दृष्टी आणि अभ्यास नसल्याने तिथे धर्मांतर रोखण्यासाठी संघ काय करतोय हे सांगितलं जात नाही.
भाजप सरकारने एका कीर्तनकाराला पंढरपूरच्या देवस्थानावर घेतला आणि मला घेतला नाही या रागाची भरपाई भाजप आणि संघाचं हिंदुत्व बेगडी आहे हे सांगून करण्याचा प्रयत्न होतो. सरसंघचालक भारताला सतावणाऱ्या लाखो विषयांपैकी हजारो विषयांवर वर्षभरात कुठे कुठे बोलतात त्यातले दोन मुद्दे उचलून त्यांच्यावर अशी टीका केली जाते कि ते काल- परवा सार्वजनिक जीवनात आलेत!
आमचंही योगदान आहे, आम्हालाही क्रेडिट द्या…
२०१४ आणि २०१९ ला भाजपची पूर्णबहुमताची सत्ता आणण्यात आम्ही सोशल मीडियावर जे दिवसरात्र लिहून जागृती केली त्याचाच परिणाम आहे त्यामुळे आम्हाला क्रेडिट मिळालंच पाहिजे असाही एक वर्ग आहे. अशा सर्वांचं योगदान नक्की आहे पण फक्त त्यांचंच योगदान नाही तर वर उल्लेख केलेल्या “कण कण आणि क्षण क्षण” या कामात खर्च करणाऱ्या हयात असलेल्या आणि दिवंगत लाखोंचं त्यात योगदान आहे. त्यामुळे कोणतेही दुराग्रह नं बाळगता आणि आपलं “हिंदुत्व- राष्ट्रवाद” यातील योगदान सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी दुसरा कसा वाईट आणि “खालचा” आहे हे दाखवण्याची आवश्यकता नाही.
२०२४ चं महायुद्ध…
पुढच्या वर्षी आपण आपल्या आयुष्यातल्या एका महत्वाच्या सर्वात मोठ्या वैचारिक- राजकीय युद्धाचे साक्षीदार ठरणार आहोत. १४, १९ नंतर राजकीय हिंदुत्व- राष्ट्रवाद यांना पराभव करण्याची २०२४ ची शेवटची संधी विरोधकांना मिळेल. ती संधी हातची गेली तर पुढे कित्येक दशके कुणीही काहीही करू शकणार नाही. सध्याच्या भाजपची या युद्धात उतरण्याची तयारी मोठी तयारी आहेच. हिंदुत्ववादी संस्था- संघटनाही या कामी आपलं योगदान देतील. पण For want of a nail, the shoe was lost पासून the kingdom was lost पर्यंत And all from the want of a horseshoe nail कुठेही लहानशी उणीव सुद्धा राहता कामा नये आणि आपलं आणि दुसऱ्याचं आणि सगळ्यांचंच यातलं योगदान महत्वाचं आणि बहुमूल्य आहे याचं भान ठेवावं. एका नाळेपायी युद्ध आणि साम्राज्य नाश पावणार नाही याचं भान असलेलं बरं.
तात्पर्य…
संघावर टीका करा, वाट्टेल ते लिहा, स्थानिक संघ कार्यकर्ते तुमच्याशी कधीही संपर्क तोडणार नाहीत. भाजपवर टीका करा, उणीदुणी काढा ते दुर्लक्ष करतील. पण सोशल मीडियावर आपणच फक्त हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचे एकमेव पुरस्कर्ते आहोत या भ्रमातून भाजप समर्थकांनी आणि स्वतंत्रपणे लिखाण, प्रचार प्रसार करणार्यांनी लवकरात लवकर बाहेर आलं पाहिजे.
या शतकात अन्न- पाणी सुद्धा विकलं जातं जे मागच्या शतकात “दान” दिलं जायचं, त्यामुळे ज्ञान विकलं जातं यात नवल नाही. म्हणून एखादा कथाकार, व्याख्याता पैसे घेऊन हिंदुत्व सांगतो त्याला काय किंमत द्यायची असा विचार नं करता त्याच्या सकारात्मक परिणामांकडे बघूया. दुसऱ्या बाजूला आम्हीच फक्त हे बहुमूल्य ज्ञानदान करतो हा अहंकार त्यांनीही नं बाळगलेला बरा कारण हेच काम विनामूल्य करणारे लाखो कार्यकर्ते आजही भारतात कानाकोपऱ्यात सक्रिय आहेत.
फुलाच्या भाषेत सांगायचं झालं तर…
मुझे तोड़ लेना वनमाली! उस पथ पर देना तुम फेंक,
मातृभूमि पर शीश चढ़ाने जिस पथ जावें वीर अनेक…