जळगावात भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : जिल्ह्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आज सोमवारी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ निदर्शने केली. यावेळी भिडे यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला. यानंतर हिंदुत्ववादी संघटनांतर्फे पोलीस प्रशासनाला निवेदनही देण्यात आले. जिल्ह्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ निदर्शने केली.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक भिडे गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा या उपक्रमासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बैठका घेत आहेत. त्यातील काही वक्तव्यांचा ठराविक भाग वगळून समाजकंटक जाणीवपूर्वक विपर्यास करून समाजमाध्यमांचा गैरवापर करून समाजामध्ये तेढ व तणाव निर्माण करीत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. राजकीय संघटना आणि काही उथळ व स्वार्थी नेतेमंडळी विरोधात कटकारस्थान करीत असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर प्रशासनाने संबंधितावर कठोर कारवाई करून योग्य ते गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी बजरंग दल, हिंदुराष्ट्र सेना, हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, विश्‍व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान, वीर जवान ग्रुप, एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठान (यावल), जुने जळगाव मित्रमंडळ, साईनाथ तरुण मित्रमंडळ, सराफ बाजार मित्रमंडळ, तरुण कुढाबा मंडळ, श्रीकृष्ण मित्रमंडळ, बाजीप्रभू मित्रमंडळ, शिवाजीनगर मित्रमंडळ, शाहूनगर मित्रमंडळ, लोकमान्य मित्रमंडळ, वज्रेश्‍वरी देवी गणेश मंडळ, जय गणेश मंडळ, न्यू अचानक मित्रमंडळ, मोरया मित्रमंडळ, भास्कर मार्केट मित्रमंडळ, गुरुदत्त मित्रमंडळ यांसह जिल्हाभरातील धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.