---Advertisement---

Jamner News : शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, शेतशिवार होणार पाणीदार

---Advertisement---

जळगाव : जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तालुक्यात शेतीला शाश्वत सिंचनाचा आधार मिळावा आणि तालुक्यात शेतशिवार पाणीदार व्हावे यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. या शेततळ्यांच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातच नव्हे तर राज्यासह देशात ऐतिहासिक जलक्रांतीचा आदर्श प्रकल्प राबवणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यात गोंडखेड येथे भव्य शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. मंत्री महाजन पुढे म्हणाले की, ‌‘तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला शेती सिंचनासाठी मुबलक पाणी मिळावे, शेती बहरावी आणि उत्पादन दुप्पट व्हावे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. शेततळे हा शाश्वत सिंचनाचा उत्तम पर्याय असून, यामाध्यमातून शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवता येईल.’ या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यातील 28 गावांमध्ये 2 हजार 20 शेततळे निर्मितीचे नियोजन आहे. यासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे. या शेततळयांसाठी शेतकऱ्यांकरीता विविध मार्गदर्शन सत्रे राबविण्यात येणार आहेत.

सुक्ष्मसिंचन शेतीसोबतच जोडव्यवसायाला संधी

गोंडखेड शिवारातील शेतकरी मेळाव्यात सुक्ष्मसिंचन शेतीसोबतच जोडधंदे म्हणून पशुपालन, मस्यपालन, फळशेती तसेच शेततळे परिसरात सोलर पॅनलद्वारे वीज निर्मिती याबाबतही माहिती देण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाच्या संधी मिळणार आहेत.

जिल्ह्यात शेततळ्यांच्या माध्ममातून पावसाचे वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी साठवण केले जाईल. यात जामनेर तालुका केवळ सिंचनासाठीच नव्हेतर शेती उत्पादनासह सर्वच क्षेत्रांमध्ये राज्यातून पहिल्या क्रमांकावर आणण्याचा निधार आहे. आणि या महत्त्वाकांक्षी जलसंधारण योजनेमुळे भविष्यात जामनेर तालुका कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या मेळाव्यास जामनेर तालुक्यातीलच नव्हेतर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच जामनेर तालुक्यालगतच्या बुलढाणा जिल्ह्यासह अजिंठा व अन्य परिसरातील शेतकरी वर्ग देखील उपस्थित होता. जामनेर तालुक्यात जलक्रांती घडविणाऱ्या या अभिनव प्रकल्पामुळे येत्या काही वर्षांत शेतीला भरघोस फायदा होईल आणि तालुका सुजलाम-सुफलाम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे

या ऐतिहासिक कार्यक्रमास आमदार मंगेश चव्हाण, स्थानिक लोकप्रतिनिधी, तापी पाटबंधारे विभाग महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. पी.के. पवार, मुख्य अभियंता जे.डी. बोटकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जलसंपदा आणि महसूल विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment