जळगाव । एकीकडे दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर येऊन ठेपला असताना त्यातच सोन्याच्या किमतीने नवीन विक्रमी उच्चांक गाठल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे डोळे पांढरे झाले. जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. पहिल्यांदाच विनाजीएसटी सोन्याचा दर ७७ हजार रुपयावर गेला आहे. यामुळे दिवाळीत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.
सध्या २२ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७२,६८० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७७,१०० रुपये प्रति तोळा इतका आहे. जीएसटीसह सोन्याचा दर ७९,२२० रुपये इतका आहे. तर दुसरीकडे १ किलो चांदीची किंमत ही आज ९३००० रुपये इतकी आहे.दरम्यान, सोने लवकरच ८०,००० रुपयांच्या घरात तर चांदी एक लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.
सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याचं कारण काय?
देशभरात सोन्याच्या किंमती अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची स्थिती आणि करन्सी एक्स्चेंज रेटचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यास भारतीय बाजारावर याचा परिणाम होतो. तसच सण-उत्सवांच्या काळात वाढत्या मागणीमुळेही सोन्याच्या दरात चढ-उतार झाल्याचं पाहायला मिळतं.