दिल्ली दिनांक
– रवींद्र दाणी
‘मृत्युंजय’ या प्रसिद्ध कादंबरीत एका ठिकाणी लिहिले आहे, ‘‘जेव्हा हाडा-मासाची माणसे अबोल होतात, तेव्हा दगड-मातीत बांधल्या गेलेल्या वास्तू बोलू लागतात…’’
भारतीय स्वातंत्र्याचे जन्मस्थान, भारतीय राज्यघटनेचे उगमस्थान आणि भारतीय लोकशाहीचे सर्वोच्च पीठ असा त्रिवेणी संगम असलेली संसद भवनाची वर्तुळाकार वास्तू आता लवकरच अबोल होणार. संसदेचे शेवटचे अधिवेशन नुकतेच पार पडले. या वास्तूत झालेले हे शेवटचे अधिवेशन ठरेल.
इतिहास घडविणारी, घडणारा इतिहास पाहणारी, तो अनुभवणारी ही वास्तू इतिहासजमा होईल. मात्र, नंतर या वास्तूचा इतिहास बोलू लागेल एक स्मारक म्हणून…
ऐतिहासिक भाषण
लंडनच्या ‘गार्डियन’ या वृत्तपत्राने विसाव्या शतकात गाजलेल्या ज्या 10 भाषणांची निवड केली आहे, त्यातील एक भाषण पं. जवाहरलाल नेहरूंचे ‘ट्रिस्ट वुईथ डेस्टिनी’ हे 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्री या वास्तूत दिले गेले होते. एक विशेष म्हणजे अशी गाजलेली भाषणे- त्या त्या वेळच्या नेत्यांनी स्वत:च्या हातांनी लिहून काढलेली होती. मग, ते नेहरू असोत, अब्राहम लिंकन असोत, रुझवेल्ट असोत की चर्चिल!
ऐतिहासिक क्षण
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये असलेल्या खांबांवर लावण्यात आलेले आज जे पंखे आहेत तेच पंखे 14-15 ऑगस्टच्या रात्री दिसत होते. उपस्थितांमध्ये पांढरी टोपी प्रामुख्याने दिसत होती आणि रात्री 12 च्या ठोक्याला देशाच्या स्वातंत्र्याची अधिकृत घोषणा पहिल्या पंतप्रधानांनी केली.
देशाची राज्यघटना
9 डिसेंबर 1946 रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाची राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू झाले. त्यावेळी सेंट्रल हॉलला कॉन्स्टिट्युशन हॉल म्हटले जात होते. अथक परिश्रमानंतर देशाची राज्यघटना तयार झाली, जी 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आली.
पहिला लष्करी विजय
1962 च्या भारत-चीन युद्धात भारताला नामुष्की पत्करावी लागली होती. देशाचे मनोधैर्य खचले होते. 15 वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या देशाला ही खंत बोचत होती. 1965 मध्ये पाकिस्तानच्या विरोधात भारताला पहिला विजय मिळाला. देशाच्या संसदेने ‘नवा भारत’ अनुभवला. 1965 च्या विजयाचे शिल्पकार लालबहादूर शास्त्री यांना मानले जाते. पण, तत्कालीन संरक्षण मंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचा त्यात मोठा वाटा होता. परिस्थितीची तातडी पाहता त्यांनी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना न विचारता भारतीय वायुदलाला सीमा ओलांडून पाकिस्तानवर हवाई हल्ले करण्याचा आदेश दिला होता.
लाहोरकडे कूच
1 सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाले. 6 सप्टेंबरला सकाळी भारतीय सैन्याने लाहोरच्या दिशेने कूच सुरू केली. त्यादिवशी स्व. चव्हाण यांनी लोकसभेत निवेदन केले. लोकसभेत याची घोषणा केल्यानंतर त्याची नोंद आपल्या डायरीत करताना, स्व. चव्हाण यांनी लिहिले आहे, ‘‘माझे निवेदन करून मी माझ्या जागेवर बसलो. मला एक नवी लोकसभा पाहावयास मिळाली. एक नवा भारत घडत असल्याचे मला दिसले.’’
आणिबाणीचा लढा
1975 मध्ये देशात आणिबाणी लागली. त्याविरोधात मोठे आंदोलन लढले गेले. त्याचे एक शिल्पकार होते डॉ. सुब्रमण्यम् स्वामी! मात्र, स्वामी यांना आपली खासदारकी वाचविण्यासाठी एकदा तरी राज्यसभेत जाऊन हजेरीपटावर सही करणे आवश्यक होते. आणि तसे करणे त्यांना जवळपास अशक्य होते. कारण, इंदिरा गांधी सरकारकडून अटक केली जाण्याची भीती होती. स्वामी यांनी चूपचाप संसदेत येण्याची योजना आखली. मोटारीतून न येता ते ऑटोरिक्षातून संसद भवन परिसरात आले. सरळ राज्यसभेत गेले. सही करून बाहेर पडले. नंतर त्याच ऑटोरिक्षातून ते पसार झाले. नंतर इंदिरा गांधींना याची माहिती मिळाली. स्वामींचा शोध सुरू झाला. पण, तोपर्यंत स्वामी फरार झाले होते. स्वामींनी इंदिरा सरकारला कसा गुंगारा दिला, याची साक्षीदार ही वास्तू ठरली.
सामूहिक राजीनामे
1984च्या निवडणुकीत काँग्रेसला अभूतपूर्व असा 413 जागांचा ऐतिहासिक जनादेश मिळाला. नंतर बोफोर्सचा मुद्दा सुरू झाला. 1989 ची निवडणूक जवळ येत असताना, विरोधी पक्षांनी लोकसभेतून सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला. विरोधी पक्षांचे संख्याबळ फक्त 55-60 होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सर्वांत मोठा पक्ष होता, तर शिवसेनेचे लोकसभेत अस्तित्वही नव्हते. विरोधी पक्षांच्या राजीनाम्यामुळे लोकसभा ओकीबोकी झालेली दिसली.
ऐतिहासिक भाषण
संसदेच्या या वास्तूने अनेक ऐतिहासिक भाषणे ऐकली. पण, लोकसभेत पराभवाच्या उंबरठ्यावर उभ्या असणार्या एका पंतप्रधानाचे भाषण अनेक वर्षे या वास्तूच्या स्मरणात राहिले. राष्ट्रपती भवनात जाऊन आपला राजीनामा सादर करण्यापूर्वी स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे तडाखेबंद भाषण या वास्तूने ऐकले होते. वाजपेयी सरकारबाबत आणखी एक इतिहास या वास्तूने अनुभवला. 1999 च्या एप्रिल महिन्यात लोकसभेत झालेल्या शक्तिपरीक्षणात वाजपेयी सरकार एका मताने पराभूत झाले होते.
अतिरेक्यांचा हल्ला
13 डिसेंबरची सकाळ! संसदेचे कामकाज नुकतेच सुरू झालेले आणि अचानक स्फोटांचे आवाज ऐकू येऊ लागले. चकमक, लहान युद्ध म्हणजे काय हे संसद भवनात दिसत होते. सायंकाळी या वास्तूचा फेरफटका मारताना वातावरणातील स्फोटकांचा दर्प जाणवत होता. अतिरेक्यांचा अंदाज आणि हिंसाचार थोडक्यात चुकला होता. पाच-सहा अतिरेकी असलेली मोटार विजय चौकाच्या दिशेने असलेल्या प्रवेशद्वारातून आत आली आणि डावीकडे वळली. तेथे उपराष्ट्रपतींसाठी राखीव प्रवेशद्वार आहे. येथे सुरक्षा जवान सज्ज असतात. पाकिस्तानी अतिरेक्यांना पाहताच येथील सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याशी मुकाबला सुरू केला. दहशतवाद्यांची ही मोटार प्रवेशद्वार क‘मांक 1 वर थांबली असती तर त्यांना सरळ सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश मिळाला असता. आणि येथे बसलेले खासदार-मंत्री त्यांच्या तावडीत सापडले असते. या दहशतवाद्यांची मूळ योजना हीच होती. भारतीय नेत्यांचे अपहरण करून त्या बदल्यात काही मागण्या करावयाच्या… या योजनेनेच ते संसद भवन परिसरात आले होते.
मोदी यांची निवड
संसदेच्या याच वास्तूने मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी झालेली निवड अनुभवली. त्यांचे भाषण ऐकले. तब्बल 30 वर्षांनंतर देशाला पूर्ण बहुमताचे सरकार मिळण्याचा क्षण अनुभवला. देशातील संमिश्र सरकारांचे युग संपुष्टात आले होते.
राहुल गांधींचे निष्कासन
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभेतून निष्कासन ही या वास्तूतील शेवटची महत्त्वाची घटना ठरली. सूरत न्यायालयाच्या निर्णयानंतर दुसर्या दिवशी लोकसभा सचिवालयाने एक आदेश जारी करीत राहुल गांधी यांच्या निष्कासनाची घोषणा केली. तेव्हापासून तर संसद एकदमच ठप्प आहे. संसदेतील हा गतिरोध केव्हा संपुष्टात येईल याचा कोणताही अंदाज बांधता येणार नाही. नव्या वास्तूत सरकार व विरोधक यांच्यात झाले गेले विसरून नवा डाव सुरू केला जाईल अशी अपेक्षा केली पाहिजे. कारण, तोच तर लोकशाहीचा गाभा आहे.
इतिहासइतिहासजमा