Jalgaon : जाणकारांचा अंदाज तंतोतंत खरा ठरला! दिवाळीपूर्वी सोने-चांदीच्या किमतीने रचला इतिहास..

जळगाव । सोने आणि चांदीच्या दरातील तेजीचे वारे कायम असून यामुळे सोने-चांदीच्या किमतींनी सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली. दिवाळीपूर्वी सोन्याचा दर ८० हजार (विनाजीएसटी) तर चांदीचा दर एक लाख (विनाजीएसटी) रुपयावर जाणार असल्याचा अंदाज यापूर्वी जानकरांनी वर्तविला होता. आता हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे.

जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदी दरात पुन्हा वाढ झाल्यामुळे चांदीने विनाजीएसटी एक लाखाचा टप्पा गाठला आहे. सोबतच सोने दरही ८० हजाराच्या उंबरठयावर पोहोचला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर झालेल्या दरवाढीने ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.

दिवाळी व त्यानंतरच्या लग्नसराईच्या तोंडावर देशातील सराफा बाजारात जोरदार तेजी दिसून येत आहे. बुधवारी जळगाव सराफा बाजारात २४ कॅरेट सोने दरात एकाच दिवशी प्रति १० ग्रॅममागे ८०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे आज गुरुवारी सकाळी सोन्याचा दर ७९,५०० वर (जीएसटीसह ८१,८८५ रु.) पोहोचले. गेल्या सहा दिवसांत सोने तब्बल दीड हजार रुपये महागले आहे, तर चांदीने मात्र एका दिवसात १ हजार रुपयांची उसळी घेतली.

यामुळे चांदीने आजवरचा उच्चांकी दर गाठला आहे . प्रथमच चांदीचा दर १ लाख रुपयावर गेला तर जीएसटीसह १,०३,००० रुपयावर पोहोचला. दागदागिन्यांसाठी वापरले जाणारे २२ कॅरेट सोने दरातही जळगाव सराफा बाजारात बुधवारी प्रति १० ग्रॅममागे ७३४ रुपयांची वाढ झाली. मंगळवारी २२ कॅरेट सोन्याचे भाव ७२, १४४ रुपये होता तो बुधवारी ७२,८७८ रु. (जीएसटीसह ७५,०६४ रु.) झाला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (आयबीजेए) देशात या वर्षी सोने भावात २४.४२ टक्के वाढ झाली आहे, तर चांदी सरासरी ३५ टक्के महागली आहे.