नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय अंतराळ संस्था ISRO नं इतिहास रचला आहे. सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी इस्त्रोने PSLV C58/XPoST लॉन्च केले आहे. या उपग्रहाच्या मदतीने ‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह (एक्स्पोसॅट) हे अंतराळातील तीव्र क्ष-किरण स्रोतांच्या ध्रुवीकरणाची तपासणी, कृष्णविवरासारख्या गूढ रचनांचे रहस्य शोधण्याचे काम करील. हे संशोधन करणारा हा भारताचा पहिला उपग्रह आहे असे इस्रोने म्हटले आहे.
४४.४ मीटर उंच पीएसएलव्ही रॉकेट प्रक्षेपणानंतर २१ मिनिटांनी प्राथमिक उपग्रहाला ६५० कि.मी.च्या पृथ्वीच्या खालील कक्षेत प्रक्षेपित करील. चौथा टप्पा पुन्हा सुरू करून शास्त्रज्ञ उपग्रहाला सुमारे ३५० कि.मी. कमी उंचीवर आणतील. प्रक्षेपक हे पीएसएलव्ही-डीएल प्रकारातील असून त्याचे वजन २६० टन आहे. या मोहिमेचे आयुष्य ५ वर्षे आहे. विशेष म्हणजे हे सॅटेलाईट अंतराळात होणाऱ्या रेडिएशनवर अभ्यास करेल. ISRO नं या मोहिमेची सुरुवात २०१७ मध्ये केली होती. या मोहिमेसाठी ९.५० कोटी रुपये खर्च आला आहे. लॉन्चिंगनंतर २२ मिनिटांनी एक्स्पोसॅट सॅटेलाईट त्याच्या निर्धारित कक्षेत पोहचला आहे.
पॉलिक्स हा सॅटेलाईटचा मुख्य पेलोड आहे. त्याला रमन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि यूआर राव सॅटेलाईट सेंटरने बनवले आहे. १२६ किलो वजनाचे हे यंत्र अंतराळात स्रोतांचे चुंबकीय क्षेत्र, रेडिएशन, इलेक्ट्रॉन इत्यादींचा अभ्यास करेल. 8-30 keV श्रेणीच्या ऊर्जा बँडचा हा अभ्यास करेल. पोलिस्क अंतराळात असलेल्या ५० पैकी ४० सर्वात जास्त चमकदार असलेल्या गोष्टींचा अभ्यास करणार आहे. चेन्नईपासून जवळपास १३५ किमी अंतरावरील अंतराळ केंद्रातून एक्स्पोसॅट लॉन्च करण्यात आले.