चोपडा : राज्यातील शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी निमशासकीय व शासकीय कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारले आहे. दरम्यान, आज बुधवारी, म्हणजे दुसऱ्या दिवशीही बेमुदत संप सुरूच ठेवण्यात आला. यावेळी संपात सहभागी कर्मचाऱ्यांकडून शासन निर्णयाची होळी करण्यात आली.
जुनी पेन्शन योजनेसाठी निमशासकीय व शासकीय कर्मचाऱ्यांकडून १४ मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात संप पुकारण्यात आला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी चोपडा येथील पंचायत समिती कार्यालयात कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले तसेच शासनाने समन्वय समितीमार्फत काढलेल्या निर्णयाची होळी करण्यात आली. सदर संपात जुनी पेन्शन मागणीसह सातवा वेतन अयोग खंड २ वेतन त्रुटी, मेडिक्लेम व इतर अनेक आवश्यक मागण्यांचा समावेश आहे.
या प्रसंगी तालुक्यातील सर्व संघटनाच्या तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व विविध पदावरील पदाधिकारी यांच्यासह राज्यातील वर्ग -१ ते चतुर्थ श्रेणी मधील ८.५ लाख कर्मचारी तसेच चोपडा तालुक्यातील ७०० ते ८०० कर्मचारी संपात सहभागी आहेत. संपाच्या दुसऱ्या दिवशी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी भेट देवून मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना, जळगाव द्वारा समन्वय समिती, चोपडा तालुका सरकारी निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांनी निवेदन दिले.