मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने कोणतेही धोरण जाहीर केले की त्याचे परिणाम सर्वच क्षेत्रांवर दिसून येतात. सध्या जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर आरबीआय अलर्टवर आहे. येणार्या काळात आरबीआयकडून मोठे निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. वाढती महागाई व मंदीला रोखण्यासाठी आरबीआय रेपो रेट आणि रिव्हर्स रेट वाढवू शकते. महागाई कमी करण्याच्या हेतूनं हा दर ०.२५ टक्क्यांनी वाढू शकतो, असा अंदाज आहे.
मागील वर्षाच्या मे महिन्यापासून आरबीआयकडून रेपो रेटमध्ये अडीच टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. फेब्रुवारीमध्ये ०.२५ टक्क्यांच्या वाढीनंतर हा रेपो रेट ६.५० टक्क्यांवर पोहोचला आहे. आता एप्रिल महिन्यात आरबीआयकडून मोठे बदल केले जाऊ शकतात. यामुळे गृह किंवा वाहन कर्ज घेतलेल्यांचा मासिक हप्ता वाढू शकतो. यामुळे वाढत्या महागाईच्या काळात मध्यमवर्गियांचा खिसा रिकामा होवू शकतो.
महागाईचा दर डिसेंबर २०२२ मध्ये ५.७२ इतका होता. ज्यानंतर जानेवारी २०२३ हा दर ६.५२ वर पोहोचला. फेब्रुवारीत किंचित घट होऊन हा आकडा ६.४४ वर पोहोचला. या सगळ्याची गणितं आता हवामानाशीही जोडली जात आहेत. कारण, कृषी क्षेत्रावर याचे थेट परिणाम दिसून येऊ शकतात. पुढच्या तीन महिन्यांमध्ये तापमानातील वाढ आणि त्यानंतर येणारा मान्सून याचाही आर्थिक गणितांवर थेट परिणाम होणार आहेत.