होमलोन, ऑटो लोनसह सर्व प्रकारची कर्जे महागणार!

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी देशातील सतत वाढत चाललेल्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा कठोर पाऊल उचलले आहे. यंदा सलग पाचव्यांदा आरबीआयने रेपो दरात वाढ केली आहे. केंद्रीय बँकेने रेपो रेट ०.३५ टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. यासह आता रेपो रेट ६.२५ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. म्हणजे आता होमलोन, ऑटो लोनसह सर्व प्रकारची कर्जे महागणार आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या ८ महिन्यांत पाचव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. गेल्या आठ महिन्यांत तब्बल २२५ टक्क्यांनी रेपो रेटमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता त्याचा अप्रत्यक्ष परिणाम गृहकर्ज आणि बँकांकडून इतर गोष्टींसाठी दिल्या जाणार्‍या कर्जांवरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आरबीआयच्या रेपो रेटमध्ये वाढ केल्याने एकीकडे गृहकर्ज, कार लोन, पर्सनल लोनचा ईएमआय वाढणार आहे, तर दुसरीकडे घर किंवा कार घेणे महाग होईल. रेपो रेट, या दरावर आरबीआय बँकांना कर्ज देते. त्यामुळे रेपो दरात वाढ झाल्यास कर्जाचा व्याजदरही वाढतो. याउलट रेपो दरात कपात केल्यामुळे कर्जाचे व्याजदर कमी होते. त्यामुळे आता रेपो दरात वाढ झाल्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, देशातील महागाई दर निश्चित केलेल्या ६ टक्क्यांच्या खाली आणण्याचे आमचे लक्ष्य आहे. याशिवाय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२३ साठी सीपीआय महागाईचा अंदाज ६.७% वर कायम ठेवला आहे. तर पुढील १२ महिन्यांत महागाईचा दर ४ टक्क्यांच्या वर राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.