तळोदा : अक्कलकुवा तालुक्यातील बाबानगर येथील मयत अंगणवाडी मदतनीसच्या नावावर परस्पर मानधन काढल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी आमदार आमश्या पाडवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत मेवास अंकुशविहिर अंतर्गत असणाऱ्या बाबानगर येथे शांता जयंतीलाल तडवी या बाबानगर अंगणवाडी केंद्रावर मदतनीस म्हणून कार्यरत होत्या. त्यांना 01/09/1996 मध्ये 50 रुपये मानधनावर पहिली नियुक्ती देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना 740 रुपये मानधनावर 28/06/2006 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने दुसरी नियुक्ती करण्यात आली होती. शांता जयंतीलाल तडवी या सेवेत असताना दि.11/10/2024 रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. शांता तडवी यांच्या निधनानंतर बाबानगर अंगणवाडीत बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका यांनी संगनमत करुन त्यांना मयत न दाखविता त्यांच्या जागी त्यांच्या नावावर दुसऱ्या महिलेला कामावर ठेवून त्या महिलेचा फोटो लावून नवीन नियुक्ती मिळालेल्या महिलेच्या बँक खात्यावर मानधन जमा करून काढुन घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करुन मयत मदतनीसच्या नावावर काम करणारी महिला व संगनमत करुन मदतनीसला मयत न दाखवता शासनाची दिशाभूल करुन दुसऱ्या महिलेच्या नावाने मानधन काढणारे बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी आमदार आमश्या पाडवी यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.