---Advertisement---
जळगाव : दारू देण्यास नकार दिल्याने चक्क हॉटेल मालकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावल तालुक्यातील आडगाव फाट्यावर गुरुवारी रात्री ९:३० वाजता ही घटना घडली. प्रमोद श्रीराम बाविस्कर (५०, रा. चंदू अण्णा नगर, जळगाव) असे जखमी हॉटेल मालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद बाविस्कर हे रेल्वेत नोकरीला असून त्यांचे चिंचोली फाट्यावर रायबा हॉटेल आहे. बाविस्कर हे गुरुवारी रात्री ९:३० वाजता आपले रायबा हॉटेल बंद करून घरी जाण्यासाठी कारमध्ये बसले.
---Advertisement---
दरम्यान, दोन जण त्यांच्याजवळ आले आणि दारूची मागणी केली असता, बाविस्कर यांनी हॉटेल बंद झाल्याचे सांगितले. यावर संतापलेल्या हल्लेखोरांनी थेट बाविस्कर यांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात बाविस्कर गंभीर जखमी झाले. घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले. बाविस्कर यांचा मुलगा आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच यावलचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे पथकासह घटनास्थळावर पोहोचले आणि पंचनामा केला. हल्लेखोर अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला
जळगाव : केटरिंगच्या कामाच्या अवघ्या १३०० रुपयांच्या वादातून केसी पार्कजवळ बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रवीण ऊर्फ सोनू देवरे या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात प्रवीण गंभीर जखमी झाला असून, त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या त्याच्या मावशीलाही मारहाण करण्यात आली.
रेखा जगदीश खत्री (वय ४८, रा. जोशी वाडा, मेहरूण) यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा संजय खत्री हा केटर्सचा व्यवसाय करतो, त्याच्याकडे यश सपकाळे हा कामाला होता. यश सपकाळे याचे १३०० रुपये संजयकडे घेणे बाकी होते. यावरून बुधवारी दुपारी व रात्री वाद झाला. यातून संजयला मारहाण केली. मध्यस्थी करणारा त्याचा आत्येभाऊ प्रवीण ऊर्फ सोनू देवरे याच्यावर प्राणघातक हल्ला केला. रेखा खत्री यांनाही मारहाण झाली. पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.