इस्रो (ISRO) नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झालं आहे. आज 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता चांद्रयान-3 प्रक्षेपित करण्यात येणार आहे. चांद्रयान-3 अंतराळयान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे. चांद्रयान-3 ने 40 दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर विक्रम लँडरच्या साहाय्याने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरेल. चांद्रयान-3 चा सुमारे 40 दिवसांचा प्रवास कसा असेल सविस्तर जाणून घ्या.
चांद्रयान-3.84 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. सर्व काही ठरल्याप्रमाणे पार पडलं तर, चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे उतरणं हे चांद्रयान-3 मोहिमेचं पहिलं लक्ष्य आहे. याआधीचा चांद्रयान-2 द्वारे चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यानंतर इस्रो पुन्हा चार वर्षानंतर चंद्रावर उतरण्याचा दुसरा प्रयत्न करणार आहे. रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर तेथील माहिती गोळा करुन चंद्राची रहस्यं उलगडण्यास मदत होईल.
इस्रोच्या LVM3M4 या रॉकेट द्वारे चांद्रयान-3 प्रक्षेपित केलं जाणार आहे. लाँच व्हेइकल मार्क-3 म्हणजेच एलव्हीएम-3 (LVM-3) रॉकेटचं हे सातवं उड्डाण असेल. LVM-3 हे बाहुबली रॉकेट चांद्रयान-3 अवकाशात घेऊन जाईल. यासोबत लँडर आणि रोव्हरही असतील. मात्र, यावेळी चांद्रयानासोबत ऑर्बिटर पाठवलं जाणार नाही. चांद्रयान-2 सोबत पाठवलेले ऑर्बिटर अजूनही तिथे कार्यरत आहे. त्याच ऑर्बिटरचा वापर चांद्रयान-3 मोहिमेसाठी करण्यात येईल.
एलव्हीएम-3 रॉकेटचा वेग ताशी 36,968 किमी LVM-3 रॉकेट दुपारी 2.35 वाजता लाँच केल्यावर त्याचा सुरुवातीचा वेग 1627 किमी प्रति तास असेल. प्रक्षेपणाच्या 108 सेकंदांनंतर रॉकेटचं द्रव इंजिन 45 किमी उंचीवर सुरू होईल. त्यावेळी रॉकेटचा वेग ताशी 6437 किमी असेल. आकाशात 62 किमी उंचीवर गेल्यावर दोन्ही बूस्टर रॉकेटपासून वेगळे होतील आणि रॉकेटचा वेग ताशी 7 हजार किमी होईल.
चांद्रयान-3 चे वातावरणापासून संरक्षण करणारी हीट शील्ड सुमारे 92 किमी उंचीवर रॉकेटपासून वेगळी होईल. 115 किमी अंतरावर चांद्रयानाचं इंजिन देखील वेगळं होईल आणि क्रायोजेनिक इंजिन कार्य करण्यास सुरुवात करेल. याचा वेग 16 हजार किमी प्रति तास असेल. क्रायोजेनिक इंजिन चांद्रयानाला 179 किमी अंतरापर्यंत घेऊन जाईल, तेव्हा त्याचा वेग 36968 किमी प्रति तास असेल.
पृथ्वीपासून चंद्राच्या कक्षेपर्यंतचा प्रवास
क्रायोजेनिक इंजिन चांद्रयान-3 पृथ्वीच्या बाह्य कक्षेत पोहोचवेल. यानंतर त्याचे सौर पॅनेल उघडलं जाईल आणि चांद्रयान पृथ्वीच्या भोवताली कक्षेत फिरण्यास सुरुवात करेल. हळूहळू चांद्रयान कक्षा आणि वेग वाढवत चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. चंद्र 100 किमीच्या कक्षेत आल्यानंतर, लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळं केलं जाईल आणि त्यानंतर लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होईल. चांद्रयानमधील लँडरचं नाव ‘विक्रम’ आणि रोव्हरचं नाव ‘प्रज्ञान’ आहे.
विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल. चांद्रयान-2 च्या लँडरचा चंद्राच्या पृष्ठभागापासून 2 किमी आधी संपर्क तुटला होता. चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यास भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरेल. त्यामुळे या मोहिमेकडे भारताप्रमाणे जगाचं लक्ष लागलं आहे.