Year Ender 2024 : संपायला अवघा एक दिवस उरला आहे. पण तुम्हाला हे माहितेय का ? की 2024 वर्ष टीम इंडियासाठी कसं राहिलं ? जाणून घेऊया आजचा या लेखात…
2024 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी चढ-उतारांनी भरलेले ठरले. भारतीय फॅन्ससाठी वर्षातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे T20 वर्ल्ड कपचे विजेतेपद ! तब्बल 11 वर्षांनी आयसीसी स्पर्धेतील भारताची प्रतीक्षा संपली. मात्र, घरच्या मैदानावरील टेस्ट मालिकेत न्यूझीलंडकडून झालेला व्हाईटवॉश हा लाजिरवाणा प्रसंग ठरला. या दोन्ही टोकांवर भारतीय क्रिकेटचे वर्ष कसे गेले, याचा आढावा घेऊया.
T20 वर्ल्ड कप 2024 : भारताचा अभूतपूर्व विजय
वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत पार पडलेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये भारताने 2007 नंतर पहिल्यांदा विजेतेपद मिळवले. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, विराट कोहली, आणि सूर्यकुमार यादव यांच्या खेळाने भारतीय संघाला मोठा विजय मिळवून दिला. राहुल द्रविडने कोचिंगचा कार्यकाळ विश्वविजेतेपदाने गाजवला आणि संघाला अलविदा केला.
IPL 2024: केकेआरचा पुनरुत्थान आणि विक्रमी बोली
कोलकाता नाईट रायडर्सने 2016 नंतर पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आणि गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली केकेआरने शानदार खेळ केला. त्याचबरोबर, 2025 च्या आयपीएल ऑक्शनमध्ये ऋषभ पंतवर 27 कोटींची विक्रमी बोली लावण्यात आली.
कसोटी : इतिहासातील सर्वोच्च विजय आणि लाजिरवाणी हार
राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारताने 434 धावांनी विजय मिळवत इतिहास घडवला. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका पराभवामुळे 12 वर्षांची विजयी परंपरा खंडित झाली. यासोबतच महान गोलंदाज आर. अश्विनने 2024 अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
नव्या चेहऱ्यांचा उदय आणि ऋषभ पंतचे प्रेरणादायी पुनरागमन
ध्रुव जुरेल, सर्फराज खान, साई सुदर्शन यांसारख्या तरुण खेळाडूंनी पदार्पण करत क्रिकेट फॅन्सचे लक्ष वेधले. तसेच, गंभीर अपघातातून सावरत ऋषभ पंतने मैदानात भव्य पुनरागमन केले. T20 वर्ल्ड कपच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा होता.
जय शहांचे यश आणि ICC च्या हायब्रिड मॉडेलचा तोडगा
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची आयसीसी संचालकपदी नियुक्ती झाली. त्यांनी 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रिड मॉडेलचा तोडगा काढला, ज्यामुळे भारतीय संघ दुबईत सामने खेळणार आहे.
यशस्वी जैस्वालची फलंदाजीची जादू
यशस्वी जैस्वालने 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. 15 कसोटीत 3 शतके आणि 9 अर्धशतकांसह 1,478 धावा काढून तो वर्षातील सर्वोत्तम फलंदाज ठरला. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.
2024 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी यश, आशा, आणि शिकवणीचे वर्ष ठरले. T20 वर्ल्ड कपचा विजय, नव्या खेळाडूंची चमक, आणि ऋषभ पंतचे कमबॅक या प्रेरणादायी गोष्टींनी भारतीय फॅन्सच्या मनात या वर्षाला खास स्थान दिले आहे.