नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 9 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत किती वेळा सुट्टी घेतली होती? असाच एक प्रश्न आरटीआयद्वारे विचारण्यात आला होता. या आरटीआयद्वारे विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तरही आले आहे. आरटीआयमध्ये आलेल्या उत्तराने सर्वांना आर्श्चयाचा धक्का बसला आहे. कारण आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानाकडून असे घडलेले नाही.
पुण्यातील आयटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल शारदा यांना आरटीआयद्वारे ही माहिती मिळाली. आयटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल शारदा यांनी पंतप्रधान कार्यालयाकडून आरटीआयद्वारे माहिती मागवली होती की, 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून किती दिवस कार्यालयात हजेरी लावली. यावर पीएमओकडून दिलेल्या माहितीनुसार, पदभार स्वीकारल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. तसेच, गेल्या 9 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आणि परदेशात 3000 हून अधिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतल्याचे म्हटले आहे.
माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पीएमओचे अवर सचिव प्रवेश कुमार यांनी दिली. पीएमओने 31 जुलै 2023 रोजी हे उत्तर दिलं आहे. दरम्यान, यापूर्वी 2015 मध्येही पीएमओकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीबाबत आरटीआयद्वारे उत्तर मागवण्यात आले होते. तेव्हाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुट्टी घेतली नसल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, हा फक्त पहिल्या वर्षीचा आकडा होता. नुकत्याच समोर आलेल्या आरटीआयमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या 9 वर्षांच्या कार्यकाळाची माहिती समोर आली आहे.