टेस्टी समोसा घरी कसा बनवाल?

तरुण भारत लाईव्ह । २४ मार्च २०२३। समोसा  हा खऱ्या अर्थाने  इंडियाज फर्स्ट फास्ट फूड आहे अस  म्हणतात ते खोटे नाही. खाऊ गल्ल्यांपासून ते  पंच /सप्त तारांकित हॉटेलमध्ये फाईन डायनिंग मध्ये हा दिमाखात मिरवतो. समोसा हा तुम्ही घरी बनवून सुद्धा पाहू शकतात. समोसा कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारताच्या माध्यमातून.

साहित्य 
2 कप = २५० ग्रॅम्स मैदा, 1-टीस्पून ओवा, मीठ, ¼ कप = 50 ग्रॅम्स तूप, 3 मध्यम आकाराचे बटाटे =250 ग्रॅम्स , कुकर मध्ये उकडून, ½ कप =75 ग्रॅम्स ताजे किंवा फ्रोझन मटारचे दाणे, 1-इंच आल्याचा तुकडा, 5-6 हिरव्या मिरच्या, ¼ कप ताजी कोथिंबीर बारीक चिरून, तेल, 1-टीस्पून बडीशेप जाडसर कुटून, 1-टीस्पून जिरे, 1-टीस्पून धणे जाडसर कुटून, ¼ टीस्पून हिंग, १/२ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड, 1-टीस्पून धणे पावडर, 1-टीस्पून गरम मसाला पावडर, ½- टीस्पून आमचूर पावडर, ¼- टीस्पून चाट मसाला, ½ टीस्पून साखर, 1-टेबलस्पून काजू बारीक तुकडे करून, 1-टेबलस्पून मनुका बारीक चिरून घेणे.

कृती
समोश्याच्या बाहेरील आवरणासाठी पीठ मळून घेऊ. एका परातीत मैदा, मीठ आणि ओवा एकत्र मिसळून घेऊ. तूप हलके कढवून ते मैद्यात हातांच्या साह्याने चांगले चोळून घेऊ.कमीतकमी ३-४ मिनिटे आपण हे तूप मैद्यात चांगले मिसळून घेऊ.

थोडे थोडे पाणी वापरून मैद्याचा एक घट्ट गोळा मळावा . मी जवळजवळ अर्धा कप पाणी वापरून घट्ट पीठ मळले आहे. आता हा मैद्याचा गोळा झाकून ३० मिनिटे ठेवावा.

समोश्याच्या सारणासाठी आले आणि हिरव्या मिरच्या खलबत्त्यात जाडसर वाटून घेऊ. मिक्सररमध्ये वाटायचं झाल्यास पाणी न घालता वाटावे.

एका पॅनमध्ये २ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे. जिरे आणि हिंग घालून घ्यावे. बडीशेप आणि धणे घालून एक मिनिट परतून घ्यावे. मटारचे दाणे घालून १ ते २ मिनिटे परतून घ्यावेत. जर मटारचे दाणे ताजे असतील तर अजून ३-४ मिनिटे शिजवून घ्यावे लागतील. आले आणि मिरचीची जाडसर पेस्ट घालून १ मिनिट परतून घ्यावे.आता सारे मसाले घालून घ्यावेत. लाल मिरची पूड, धणे पावडर, गरम मसाला आणि मीठ घालून हा सारा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा. मसाले कोरडे होऊन करपू नयेत म्हणून २-३ टेबलस्पून पाणी घालून परत परतून घ्यावेत. जर तिखट खायला आवडत असेल तर मिरची पावडर जास्त घालू शकता आणि जर मुलांसाठी बनवायचे असेल तर मिरची पूड कमी घालावी.

३- ४ मिनिटे आपण हा मसाला शिजवून घेतला आहे. आता साखर घालून घेऊ. साखर घातल्याने सारण जास्त चवदार बनते. आता बटाटे हाताने कुस्करून मसाल्यात मिसळून घेऊ. आता काजू आणि मनूका घालू. आता चाट मसाला, आमचूर पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. हे मिसळून २-३ मिनिटे शिजवून घेऊ. समोश्याचे सारण तयार आहे . गॅस बंद करून सारण थंड होऊ देऊ.

३० मिनिटांनंतर मैद्याचा गोळा थोडा नरम होतो. आता आपण समोश्यासाठी पार्र्या लाटून घेऊ. मैद्याच्या गोळ्याचे ३ करून घेऊ . एकेका गोळ्याला पोळपाटावर चांगले मळून लांब वळी करून घेऊ . समान आकाराच्या गोळ्या कापून घेऊ.

एकेका गोळीला पोळपाटावर दाब देऊन चांगले मळून घेऊ जेणेकरून त्यात भेगा राहणार नाही. तेल लावून लाटण्याने मैद्याच्या पातळ लांबट पाऱ्या लाटून घेऊ.

आता जवळ एक पाण्याची वाटी, समोश्याचे सारण आणि सूरी ठेवावी. सुरीने पारी मधोमध कापून, २ समान अर्धे भाग करावे. जिथे कापले गेलेय त्या सरळ रेषेवर पाणी लावून घेऊ आणि त्या २ कडा एकमेकांवर चिकटवून कोन बनवून घेऊ. या कोनमध्ये १ ते १. ५ चमचा सारण भरून हलक्या हाताने आत ढकलावे. आता जी पारीची मोकळी वक्राकार बाजू आहे तिलादेखील पाणी लावून घेऊ. आणि ती बाजू समोरच्या कोनाच्या बाजूवर चिकटवावी. अशाप्रकारे सर्व समोसे तयार करावेत.

समोसे तळण्याआधी ते १० मिनिटे न झाकता हवेवर कोरडे होऊ द्यावेत जेणेकरून तळताना त्यावर हवेचे बुडबुडे येणार नाहीत.

समोसे तळण्यासाठी कढईत तेल गरम करावे. समोसे तेलात बुडतील इतपत तेल असावे. समोसे मंद ते मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावे.

इतक्या सारणात २० ते २२ लहान समोसे बनतात. गरम गरम समोसे पुदिन्याच्या किंवा चिंचेच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो केचप सोबत स्वादिष्ट लागतात.