टाटामुळे गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई; १४० टक्के फायदा

मुंबई : टाटा समूहाच्या टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स आज, ३० नोव्हेंबर २०२३ रोजी बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध झाले आहेत. तब्बल १९ वर्षांनंतर टाटा समूहाची आणखी एक कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली असून टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळाला. या शेअरपे पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर टाटा टेक्नॉलॉजीचा शेअर १४० टक्के प्रीमियमसह ११९९.५० रुपयावर सूचिबद्ध झाले.

कंपनीने टाटा टेकची इश्यू किंमत ५०० रुपये प्रति शेअर निश्चित केली होती. मार्केट विश्लेषकांना इक्विटी शेअरच्या इश्यू किंमतीच्या तुलनेत ७५% प्रीमियमवर ब्लॉकबस्टर लिस्टिंग अपेक्षित होती. मात्र नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स आज प्रति शेअर रु. १,२०० वर सूचीबद्ध झाले जे ५०० रुपायाच्या इश्यू किमतीपेक्षा १४०% जास्त तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स १,१९९.९५ रुपयावर सूचीबद्ध झाले. यामुळे पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला असल्याचे दिसत आहे.

सूचीबद्ध झाल्यानंतर टाटा टेक्नॉलॉजीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी येईल आणि शेअरची किंमत लिस्टिंगच्या तारखेलाच रु. १,५०० च्या पातळीपर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे. टाटा मोटर्सच्या उपकंपनीचा आयपीओ २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत गुंतवणूकदारांसाठी खुला झाला होता. कंपनीने ३,०४२.५१ कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात आणला होता ज्याला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रेकॉर्डनुसार कंपनीकडे ७३.५८ लाख अर्ज आले म्हणजे एकूणच कंपनीचा आयपीओ ६९.४३ पट सबस्क्राइब झाला.