---Advertisement---
नंदुरबार : भाजपमध्ये इनकमिंग सुरु असून, जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुळा पाडवी, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांच्यासह १३४ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी शहरातील भाजपच्या ‘विजयपर्व’ या जिल्हा कार्यालयात प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपची ताकद वाढल्याचे मानले जात आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष नीलेश माळी, भाजपचे आमदार राजेश पाडवी, मालेगाव जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे, जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी, कैलास चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन खानवाणी डॉ. सपना अग्रवाल, शहराध्यक्ष नरेश कांकरिया, भीमसिंग राजपूत, युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्रेम पाटील, धानोरा मंडळाध्यक्ष गणेश चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या दहा दिवसांपासून भाजपमध्ये वेगवेगळ्या पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे.
३१ ऑगस्टला काँग्रेसच्या कार्यकर्त्या डॉ. समिधा नटावदकर, तर १ सप्टेंबरला शिवसेना शिंदे गटाच्या दोन माजी नगरसेवकांसह ११७ शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि १३४ कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला असून, यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. त्याचा लाभ आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होईल, अशीही चर्चा रंगली आहे.
भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विकसित देश व महाराष्ट्रासाठी भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. जनतेचा केवळ भाजपवर विश्वास असून, अनेक कार्यकर्ते आमच्या नेत्यांच्या कामावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश करीत आहेत. या कार्यकर्त्यांना पक्षाच्या कार्यप्रणालीप्रमाणे सांभाळून घेऊ व त्यांना विश्वासात घेऊन आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत
निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश प्राप्त करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आगामी काळात भाजपमध्ये अनेक पक्षांचे कार्यकर्ते येणार असून, काँग्रेससह विरोधी पक्षांतील कार्यकर्ते त्या पक्षाचा झेंडा लावण्यासाठी शिल्लक राहणार नाही, असा दावा विजय चौधरी यांनी केला.
यांनी हाती घेतले ‘कमळ
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुळा पाडवी, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, नंदुरबार तालुकाध्यक्ष रवींद्र नाईक, तळोदा तालुकाध्यक्ष जंगलसिंह पाडवी, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष शिवाजी वसावे, जिल्हा उपाध्यक्ष गुलाबसिंग पाडवी, नवापूर तालुकाध्यक्ष अनिल पाडवी, जिल्हा सचिव विकास वसावे, ग्रामपंचायतीच्या सदस्या रिना वसावे यांच्यासह नंदुरबार तालुक्यातील लोणखेडा व लोय ग्रामपंचायत, तळोदा तालुक्यातील लाखापूर, चिनोदा ग्रामपंचायत, तसेच नवापूर तालुक्यातील खेरवा ग्रामपंचायत येथील आजी-माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसह १३४ कार्यकत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला