---Advertisement---
शहादा / नंदुरबार : शहरात शिवसेनेचा कार्यकर्ता प्रवेश मेळावा उत्साहात झाला. या वेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष, पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने शहाद्यात शिवसेनेची ताकद वाढली असल्याचे मानले जात आहे.
शहादा शहरातील अन्नपूर्णा लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला. या वेळी शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, माजी उपनगराध्यक्ष जहीर शेख, माजी नगरसेवक सुपडू खेडकर, नंदुरबारचे माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी नगरसेवक मुकेश चौधरी, हिरालाल अहिरे, लोटन धोबी, रवींद्र जमादार आदी उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना वाढवायची आहे. मीही सुरुवातीला भाजपमध्ये होतो; परंतु मला वारंवार डावलण्यात आल्याने मी शिवसेनेत आलो आणि मला न्याय मिळाला. शिवसेनेवर विश्वास असल्याने पक्षात मोठ्या प्रमाणावर प्रवेश होत आहेत. आम्ही सामान्य शिवसैनिक आहोत, त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी दिवसरात्र उपलब्ध राहू. येणाऱ्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना परिश्रम घ्यावे लागणार आहेत. नगराध्यक्ष, नगरसेवक जास्तीत जास्त निवडून पक्षाची ताकद वाढवायची आहे. जिल्ह्यात गत पाच वर्षांत शिवसेनेचा बोलबाला वाढला आहे, असे मत आमदार आमशा पाडवी यांनी व्यक्त केले.
शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने शहाद्यात शिवसेनेची खरी मुहूर्तमेढ झाली आहे. भाजपला कार्यकर्ते सांभाळता आले नाहीत, म्हणून कार्यकर्त्यांनी पक्ष सोडत शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेला या माध्यमातून चांगली टीम मिळाली आहे. शहरवासियांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्हाला कोणी कमी लेखत असाल, तर त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार रघुवंशी यांनी दिला.
मनलेश जायसवाल यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेंद्र पेंढारकर यांनी आभार मानले. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची वाद्याच्या गजरात मिरवणूक काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
स्वाभिमानासाठीच शिवसेनाप्रवेश : जमदाडे
माझा राजकीय, सामाजिक कार्याचा जन्म भाजपमध्ये झाला. पक्षासाठी लढलो; पण व्यक्ती श्रेष्ठ असल्याने आमचा सन्मान हिरावण्यात आला. स्थानिक नेतेच विरोधात असल्याने पक्षालाही त्यांच्यापुढे हतबल व्हावे लागले, ही शोकांतिका आहे. घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांना महत्त्व नाही. आमच्या व्यथा मांडण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून वरिष्ठांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात होता; परंतु वरिष्ठ भेट देत नव्हते, द्वेषातून कार्यकर्त्यांना लांब ठेवण्यात आले. अखेर स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी साजीद अन्सारी, रवींद्र जमादार यांनी मनोगत व्यक्त केले.
---Advertisement---