---Advertisement---
नंदुरबार : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचाली सुरु झाल्या असून, इच्छूक कार्यकर्त्यांचा कोणत्या पक्षात संधी मिळेल, यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. अर्थात पक्ष प्रवेश मोठ्या होत असून, नंदुरबारमध्ये शिवसेना युवानेत्यासह दोन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष नीलेश माळी यांच्या उपस्थितीत पक्षाच्या ‘विजयपर्व’ या जिल्हा कार्यालयात कमळ हाती घेतले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला हा धक्का मानला जात आहे.
येथील शिवसेनेचे युवानेते संदीप चौधरी, माजी नगरसेवक प्रमोद बोडके, माजी नगरसेवक जयसिंग राजपूत, रामा मराठे, अल्पेश मराठे, नाना चौधरी, गुंजन शिंपी, दिनेश वंजारी यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी ‘जय महाराष्ट्र’ करीत भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी व जिल्हाध्यक्ष नीलेश माळी यांनी त्यांचे स्वागत केले.
शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेना गटात खळबळ उडाली असून, आगामी काळात विविध पक्षांतील नेते व कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होतील, असा विश्वास प्रदेश महामंत्री चौधरी यांनी व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष माळी यांनी संदीप चौधरींसह शेकडो कार्यकर्त्यांचे स्वागत केले. संदीप चौधरी, प्रमोद बोडके व जयसिंग राजपूत यांच्या पक्षप्रवेशाने भाजपची ताकद वाढली आहे.
पक्षप्रवेश सोहळ्यास जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन खानवाणी, डॉ. सपना अग्रवाल, राजेंद्र सोनार, शहराध्यक्ष नरेश कांकरिया, संदीप चौधरी, काजल मछले, मंदार चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.