खेडी-भोकरीचा पूल ठरणार पालकमंत्र्यांच्या आगामी यशाचा मार्ग

तरुण भारत लाईव्हl १५ फेबु्रवारी२०२३ l  जळगाव, धरणगाव आणि चोपडा या तीन मोठ्या तालुक्यांना जोडणारा खेडी-भोकरीचा पूल हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी आगामी निवडणुकीच्यादृष्टीने यशाचा नवा मार्ग ठरणारा असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, तापी नदीवरील या उंच पुलाच्या जोडरस्त्यासह बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या दि. १६ रोजी दुपारी २ वा. होणार आहे.

शिंदे सरकारची मुलुख मैदान म्हणून ओळख असलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या सात वर्षाच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात विकासकामांचा अक्षरश: धडका लावला. युती सरकारच्या काळात सहकार राज्यमंत्री त्यानंतर तत्कालीन मविआ सरकारच्या काळात आणि आताच्या शिंदे-ङ्गडणवीस सरकारच्या काळात पाणीपुरवठा मंत्रालयाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. मतदारसंघासह संपूर्ण राज्यभरात सर्वसामान्यांशी त्यांची जुळलेली नाळ आजही कायम आहे.

राज्यभरात ३५ हजार पाणीपुरवठा योजनांना मंजूरी

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची पाणीपुरवठा मंत्री म्हणून सुरू असलेली कारकीर्द ही निश्‍चीतच लक्षात राहण्याजोगी आहे. राज्यात कधी नव्हे तो ३५ हजार पाणीपुरवठ्याच्या प्रस्तावांना मंजूरी देण्याचे काम ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ‘मला पाणीवाला बाबा व्हायचे’ असे विधान कायम ना. गुलाबराव पाटील यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळते. पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देऊन त्यांनी हे विधान सार्थ ठरविले आहे.

विविध विकास कामांचेही लोकार्पण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हसावद रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन, बांभोरी येथील गिरणा नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम, धरणगाव तालुक्यातील विविध ठिकाणी रस्ते डांबरीकरण व पुलाचे बांधकाम, जळगाव व धरणगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकास कामे, धरणगाव येथे पशुसंवर्धन दवाखाना इमारतीचे बांधकाम या कामांचे लोकार्पण केले जाणार आहे.

शेकडो ग्रामस्थांच्या वाहतुकीचा मैलाचा दगड पार

जळगाव-धरणगाव- चोपडा या तीन तालुक्यांना जोडणारा तापी नदीवरील चोपडा-खेडी-भोकरी-भोकर-अमोदा-कानळदा ह्या १५० कोटी रुपयांच्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन म्हणजे पालकमंत्र्यांचे स्वप्न सत्यात उतरत असल्याची कृती आहे. ६६० मीटर लांबी असलेल्या या पूल व जोडरस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या दि. १६ रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहे. भूमिपूजनानंतर या पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. तसेच या पुलामुळे शेकडो नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्‍न कायमचा सुटणार आहे. हा पूल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आगामी निवडणुकीसाठी एक यशाचा मार्ग ठरणारा असल्याची चर्चा रंगत आहे.