---Advertisement---
जळगाव : हरणाची शिकार करण्यासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील दोघा शिकाऱ्यांना वनविभागाने जेरबंद करत, त्यांच्याकडील गावठी बंदूक, चाकू व मोटारसायकल जप्त केली. डोलारखेडा जंगलात ही कारवाई करण्यात आली.
शिकारीच्या उद्देशाने संशयित जंगलात शिरल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. वढोदा वनपरिक्षेत्र अधिकारी परिमल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली डोलारखेडा वनपाल गणेश गवळी, वनरक्षक नवल जाधव, जी.पी. गोसावी, अक्षय मोरे, स्वप्निल गोसावी, नितीन खंडारे, सुधाकर कोळी, रजनीकांत चव्हाण, उमेश तायडे, महिंद्रा पुरकर यांच्या गस्ती पथकाने त्यांचा शोध घेतला.
दरम्यान, जलील अहमद अख्तर हुसेन आणि अजीज उल हक जमील उल हक (दोघे रा. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) हे डोलारखेडा परिमंडळातील कक्ष क्र. ५४२ मध्ये शिकार करण्याच्या उद्देशाने फिरताना आढळले.
गस्ती पथकाची चाहूल लागताच, शिकारी मोटारसायकलने पळून जाऊ लागले असता, पथकाने त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर झडप घातली. हरणाची दोघा संशयितांकडून एक गावठी बंदूक, चाकू, पाच जिवंत काडतुसे व एक मोटारसायकल असा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांना पहाटे अटक करून वढोदा वनपरिक्षेत्राच्या कुऱ्हा येथील कार्यालयात आणण्यात आले. त्यांच्या विरोधात उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करणे सुरू होते.








