श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी पडले मागे, आता ही व्यक्ती आहे सर्वांत श्रीमंत

मुंबई : हुरुन इंडिया आणि ३६० वन वेल्थने आज ३६० वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३ (Hurun India Rich List 2023) जारी केली जी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची १२ वी वार्षिक रँकिंग आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांना मागे टाकून सर्वात श्रीमंत भारतीयाचा किताब पुन्हा मिळवला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी या यादीत पहिल्या क्रमांकावर होते.

गौतम अदानी यांची संपत्ती मुकेश अंबानींच्या तुलनेत खूपच कमी नोंदवली गेली. जानेवारी महिन्यात आलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या खळबळजनक अहवालामुळे अदानींच्या निव्वळ संपत्तीत लक्षणीय घट झाली. अहवालानुसार, मुकेश अंबानी यांची संपत्ती २०१४ मधील १,६५,१०० कोटी रुपयांवरून २०२३ मध्ये अंदाजे ८,०८,७०० कोटी रुपयांपर्यंत वाढली. ही वाढ चार पट आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी ४७४,८०० कोटी रुपयांच्या मालमत्तेसह दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत. तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस एस. पूनावाला भारतातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांची संपत्ती २,७८,५०० कोटी रुपये आहे.

एचसीएलचे शिव नाडर यांच्याकडे २,२८,९०० कोटी रुपयांची संपत्ती असून ते या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. यानंतर गोपीचंद हिंदुजा आणि कुटुंब १,७६,५०० कोटी रुपयांसह पाचव्या स्थानावर आहे. सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि नेते दिलीप सांघवी हे १,६४,३०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह सहाव्या स्थानावर आहेत. त्यानंतर एल. एन मित्तल आणि कुटुंब १,६२,३०० कोटी रुपयांची मालमत्ता, राधाकिशन दमानी १,४३,९०० कोटी रुपयांची संपत्ती, कुमार मंगलम बिर्ला आणि कुटुंब १,२५,६०० कोटी रुपयांची मालमत्ता आणि नीरज बजाज व कुटुंब १,२०,७०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे.