तरुण भारत जळगाव । अमळनेर : तालुक्यातील नुकत्याच झालेल्या लोण ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत पती-पत्नी फक्त दोन-दोन मते मिळून विजयी झाले.
लोणखुर्द येथील रहिवासी व भारतीय सीमा सुरक्षा बलाच्या सेवेत अरुणाचल प्रदेशातील भूतान सीमेवर सेवारत असलेल्या जवानाचा वाहनाचा अपघात होऊन जागीच मृत्यू होऊन शहीद झाल्याने गावकऱ्यांनी आदल्या रात्री बैठक घेतली आणि दुखवटा म्हणून पोटनिवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलिस पाटील आणि इतर दोन जण मतदानाला आल्याने या प्रभागात फक्त तिघांचे मतदान झाले.
त्यात हिलाल भटा पाटील व लीलाबाई हिलाल पाटील हे पती-पत्नी प्रत्येकी दोन-दोन मते मिळाल्याने विजयी झाले. तर एक मत नोटाला पडले. एका प्रभागात शून्य मतदान झाल्याने त्या प्रभागातील जागा पुन्हा रिक्त राहिली. लोणसिम व लोण चरम या गावाला देखील अनुसूचित जमाती प्रवर्गात उमेदवार न मिळाल्याने एकही अर्ज दाखल झाला नाही.