---Advertisement---
प्रयागराज । उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात एक अविश्वसनीय घटना घडली आहे. झारखंडच्या एका कुटुंबाला त्यांचा 27 वर्षांपूर्वी हरवलेला सदस्य याच कुंभमेळ्यात आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा हरवलेला व्यक्ती आता अघोरी साधू म्हणून ओळखला जात आहे. या प्रकारामुळे कुंभमेळ्यात एक वेगळेच चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.
झारखंडच्या यादव कुटुंबाने दावा केला आहे की, 1998 मध्ये बेपत्ता झालेले गंगासागर यादव हे आता ‘अघोरी’ साधू बनले आहेत. त्यांना लोक बाबा राजकुमार म्हणूनही ओळखतात. गंगासागर यादव यांचे वय सध्या 65 वर्षे आहे. 1998 मध्ये ते पाटण्याला गेले असता अचानक बेपत्ता झाले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाला त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यांच्या पत्नी धनवा देवी यांनी आपल्या दोन मुलांचा—कमलेश आणि विमलेश—एकट्याने सांभाळ केला.
गेल्या काही दिवसांपूर्वी यादव कुटुंबातील एका नातेवाईकाने कुंभमेळ्यात एका साधूला पाहिले, जो गंगासागर यादव यांच्यासारखा दिसत होता. त्याने त्यांचा फोटो काढून कुटुंबाला पाठवला. फोटो पाहिल्यानंतर संपूर्ण कुटुंब प्रयागराजमध्ये पोहोचले आणि त्यांनी या साधूची भेट घेतली. मात्र, बाबा राजकुमार यांनी त्यांची जुनी ओळख सपशेल नाकारली आणि आपण वाराणसीचे साधू असल्याचा दावा केला. त्यांच्या सोबत असलेल्या एका साध्वीनेही हेच सांगितले.
हेही वाचा : धक्कादायक! मुलांनीच संपवलं आईच्या बॉयफ्रेंडला, रस्त्यावरच केला थरारक हल्ला
यादव कुटुंबाच्या मते, त्यांनी गंगासागर यांच्या शरीरावरील काही ओळखीच्या खुणा तपासल्या. लांब दात, डोक्यावरची जखमेची खूण आणि गुडघ्यावरील जुनी जखम पाहता, हेच गंगासागर यादव असल्याचा त्यांचा ठाम दावा आहे. यामुळेच कुटुंबाने प्रयागराज कुंभमेळा पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, बाबा राजकुमार यांची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली आहे.
DNA चाचणीने उलगडणार सत्य?
गंगासागर यादव यांचे धाकटे भाऊ मुरली यादव म्हणाले, “आमचा भाऊ पुन्हा कधी सापडेल याची आम्ही आशाच सोडली होती. पण आता आम्हाला खात्री आहे की हेच गंगासागर आहेत. जर DNA चाचणीत आमच्या दाव्याला पुष्टी मिळाली नाही, तर आम्ही बाबा राजकुमार यांची माफी मागू.”
हेही वाचा : हृदयद्रावक ! रेल्वे रुळ ओलांडण विद्यार्थिनीला पडलं महागात; अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ व्हायरल
---Advertisement---

काय होणार पुढे ?
कुटुंबातील काही सदस्य घरी परतले असले तरी, काही जण अजूनही कुंभमेळ्यात थांबले असून बाबा राजकुमार यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. 27 वर्षांपूर्वी गंगासागर हरवल्यामुळे त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. त्यांचा मोठा मुलगा त्यावेळी अवघा दोन वर्षांचा होता. आता DNA चाचणीच या रहस्याचा उलगडा करणार आहे. सत्य काय आहे, हे लवकरच समोर येईल!