Husband-wife divorce : मशेरीमुळे उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील पती-पत्नीमधील भांडण सध्या खूप चर्चेत आलंय. पत्नीला मशेरीचं व्यसन आहे. ती दिवसातून तीन-चारवेळा मशेरी लावते. हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचलंय. याचा परिणाम असा झालाय की, बायको नवऱ्याला सोडायला तयार आहे, पण मशेरी सोडायला तयार नाही.
हे प्रकरण आग्रा येथील मंटोला पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या तरुणानं आपल्या पत्नीबाबत पोलिसांत तक्रार केली होती. तरुणाने सांगितलं की, 8 महिन्यांपूर्वी फतेहपूर सिक्री येथे राहणाऱ्या तरुणीशी त्याचं लग्न झालं होतं. त्यांच्या पत्नीला मशेरी लावायची आहे. त्यामुळे घरात वाद निर्माण होतात. त्याची पत्नी 2 महिन्यांपासून तिच्या माहेरच्या घरी राहत आहे. तिला अनेकदा फोन केला पण ती येत नाही, असं त्याने पोलिसांना सांगितलं होतं.
पती-पत्नीमधील घरगुती वादामुळं पोलिसांनी हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवलं. ती वापरत असलेल्या मशेरीमध्ये तंबाखू असल्याचं महिलेला समजावून सांगण्यात आलं. त्याचं सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे.
यामुळे कर्करोगासारखे जीवघेणे आजार होऊ शकतात, असं सांगितलं गेलं. पण महिला काही ऐकायला तयार नव्हती. तिच्या या हट्टीपणाचं समुपदेशकांनाही आश्चर्य वाटलं. कौटुंबिक समुपदेशन केंद्राचे प्रभारी एसआय अपूर्व चौधरी यांनी दोघांनाही समुपदेशनाच्या पुढील तारखेला बोलावलं आहे.