भुसावळ : भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस शनिवार, 28 जानेवारी ते 1 एप्रिलपर्यत रेल्वे प्रशासनाने रद्द केल्याने लग्न, शाळांच्या परीक्षेच्या काळात रेल्वे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहे. मुंबई विभागातील कर्जत रेल्वे स्थानकाच्या रीमॉडेलिंगच्या कामामुळे ही गाडी रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.
रेल्वे प्रवाशांचे हाल
भुसावळ येथून पुण्यासाठी जाणारी हुतात्मा एक्स्प्रेस (11025) ही गाडी 29 जानेवारी ते एक एप्रिल या काळात तर पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी 28 जानेवारी ते 31 मार्चपर्यत रद्द करण्यात आली. भुसावळ येथून पुण्यासाठी सुटणारी ही एकमेव गाडी आहे, यामुळे नाशिक, कल्याण, पनवेल, लोणावळा येथे जाणार्या ही गाडी सोयीची असलीतरी ही गाडी आता बंद केली जात असल्याने प्रवाशांना या भागात जाण्यासाठी दुसरी अन्य गाडी नाही. खाजगी ट्रॅव्हल्सचे दर मोठ्या प्रमाणावर वाढलेले असल्याने सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला आता अधिकचा भूर्दंड सोसावा लागणार आहे.
हुतात्मा मनमाडमार्गे सोडा
मुळात पुण्यात जाण्यासाठी भुसावळ येथून सुटणारी ही एकमेव हुतात्मा एक्स्प्रेस असून ही गाडी मनमाड, दौंडमार्गे पुण्यासाठी सुरू ठेवावी, अशी मागणी होात आहे. जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास ही गाडी सुरू होवू शकेल, असा आशावादही व्यक्त होत आहे.