धुळे : कार भाडेतत्वावर घेऊन त्याची परस्पर विक्री करणाऱ्या हैदराबादस्थित टोळीला धुळे तालुका पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी टोळीच्या ताब्यातून दोन महागड्या कार जप्त केल्या असून, या टोळीने यापूर्वीही अनेक फसवणुकीचे प्रकार केले असल्याचा संशय आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे एका व्यक्तीची फसवणूक केल्यानंतर पुन्हा तसाच प्रकार करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी सापळा रचून आरोपींना बेड्या ठोकल्या. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी याबाबत माहिती दिली.
फसवणुकीची शक्कल
नांदगाव (जि. नाशिक) येथील अभिषेक शिवाजी पाटील यांना सोशल मीडियावर महिंद्रा थार (क्रमांक TS 07 KB 7004) ही कार विक्रीसाठी असल्याची माहिती मिळाली. त्यांनी संबंधित विक्रेत्यांशी संपर्क साधला. आरोपी अरबाज नसीम शेख, अझरुद्दीन अब्दुल रज्जाक, सैय्यद अबरार आणि अकबर अहमद यांनी पाटील यांच्याशी व्यवहार निश्चित केला. शिरुड चौफुली येथे प्रत्यक्ष भेट घेत सहा लाख रुपयांत गाडीचा सौदा ठरवण्यात आला. त्यातील तीन लाख रुपये आगाऊ घेतल्यानंतर उर्वरित रक्कम गाडी नावावर करताना घेण्याचे ठरले.
मात्र, कार नावावर करण्यासाठी पाटील यांनी आरोपींशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. यानंतर दहा दिवसांनी काही अनोळखी व्यक्तींनी पाटील यांच्याशी संपर्क साधून आपणच गाडीचे खरे मालक असल्याचा दावा केला. त्यांनी गाडीमध्ये जीपीएस ट्रॅकर लावला असल्याचे सांगत, तिचा मागोवा घेतला आणि कार पुन्हा नेली.
नाव बदलून पुन्हा संपर्क साधला अन् टोळीला अटक
या फसवणुकीची तक्रार पाटील यांनी पोलिसांत दिली. त्यानंतर पाटील यांनीच नव्या नावाने आरोपींशी पुन्हा संपर्क साधून, मारुती सुझुकी एक्सएल6 (क्रमांक TG 07 C 1989) खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. आरोपींनी गाडीचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवल्यानंतर सौदा ठरवण्यात आला आणि शिरुड चौफुली येथे गाडी आणण्यास सांगण्यात आले.
यावेळी पाटील यांनी या फसवणूक करणाऱ्या आरोपींना ओळखले आणि आरडाओरड केली. नागरिकांच्या मदतीने सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी वेळीच धाव घेत आरोपींना पकडले आणि त्यांच्याकडून दोन गाड्याही जप्त केल्या.
पोलिसांचे नियोजनबद्ध ऑपरेशन
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, तसेच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कॉन्स्टेबल छाया पाटील, हवालदार कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील, ललित खळगे, योगेश पाटील, अविनाश गहिवड, चेतन कंखरे, योगेश कोळी, धीरज सांगळे, सखाराम खांडेकर, राजू पावरा आणि भावेश झिरे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे कार भाड्याने घेऊन विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, या टोळीने याआधी किती फसवणुकीचे प्रकार केले आहेत, याचा तपास सुरू आहे.