समाजसेवकाच्या सत्काराला आलेला एवढा जनसमुदाय माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही!

मुंबई : प्रचंड ऊन असतानाही तुम्ही आलात आणि सकाळापासून इथं बसून आहात यावरून तुमच्या मनात आप्पासाहेबांबाबतचा आदर दिसून येतो. केवळ त्याग आणि सन्मानानंच हा आदर निर्माण होतो. दिल्लीतून मी केवळ आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान करण्यासाठी आलो आहे. समाजसेवकाच्या सत्काराला आलेला एवढा जनसमुदाय माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढे बोलतांना म्हणाले की, त्याग, समर्पण आणि सेवेच्या माध्यमातून आप्पासाहेबांनी मोठं काम केलं आहे. समाजसेवेचा संस्कार तीन पिढ्यात राहतो हे मी प्रथमच पाहत आहे. आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सरकारनं लाखो लोकांना प्रेरणा देण्याचं काम केलं असल्याचं शाह म्हणाले. यावेळी त्यांनी योग्य व्यक्तिचा सन्मान केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले.

यासोबतच हा अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी लाखो अनुयायांनी उपस्थिती लावली होती. ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्मश्री किताबाने सन्मानित डॉक्टर श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा इथल्या त्यांच्या निवास्स्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.