दिल्ली : विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक आज (मंगळवार, १९ डिसेंबर) दिल्लीमध्ये पार पडत आहे. या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, नितीशकुमार, स्टॅलिन यांच्यासह दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत. या बैठकीआधी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना ‘इंडिया आघाडी’चा चेहरा ठरवण्याबाबत सर्वात मोठे विधान केले आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“आज इंडिया आघाडीची बैठक होत आहे. अनेक मुद्यांवर आज चर्चा होईल. आता निवडणुकीच वर्ष सुरू होत आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने रणनीती या बैठकीतून ठरवली जाईल. पंतप्रधानपदाचा चेहरा नाही, पण आघाडीला कोणीतरी निमंत्रक असावा, सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी चेहरा हवा. त्यामुळे आघाडीचा चेहरा ठरवता येतो का? हे पाहावे लागेल..” असे सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
अरविंद केजरीवाल नाराज?
इंडिया आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली. त्याआधी अरविंद केजरीवाल नाराज असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी हा दावा खोडून काढला. “अरविंद केजरीवाल नाराज नाहीत. मी काल त्यांची भेट घेतली. हसत खेळत वातावरण होतं. आजच्या बैठकीसाठी काय मुद्दे असावेत यावर चर्चा झाली…” असे उद्धव ठाकरे म्हणालेत.