वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या बचावासाठी पुढे आले वडील; म्हणाले…

महाराष्ट्रात आपल्या कृत्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरची नोकरी धोक्यात आली आहे. आयएएस होण्यासाठी बनावट अपंगत्व आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. केंद्र सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान, पूजाच्या वडिलांनी आपल्या मुलीचा बचाव करताना सांगितले की, तिने कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही.

बनावट प्रमाणपत्राद्वारे आयएएस अधिकारी झालेल्या पूजाच्या वडिलांनी रविवारी सांगितले की, तिने काहीही चुकीचे किंवा बेकायदेशीर केलेले नाही. दिलीप खेडकर यांनी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, मर्यादित साधनसंपत्ती असलेली व्यक्ती 4 ते 5 एकर जमिनीचा मालक बनत असेल आणि मूल्यमापनाच्या आधारे त्याची मालमत्ता कित्येक कोटी रुपयांची असेल, तर ते चुकीचे कसे आहे. “क्रिमी लेयर निश्चित करणे हे मालमत्तेच्या मूल्यांकनापेक्षा उत्पन्नावर अवलंबून असते.”

आलिशान कार एका नातेवाईकाची होती : वडील दिलीप
आपल्या मुलीच्या बचावात ते म्हणाले, “पूजाने सरकारी कामासाठी ‘लक्झरी’ कार वापरली कारण तिच्याकडे कोणतीही सरकारी गाडी उपलब्ध नव्हती. यासाठी त्यांनी वरिष्ठांची परवानगीही मागितली होती. ही कार तिची नसून  नातेवाईकांची आहे. गाडीत लाल दिवा लावून तिने कोणाचीही फसवणूक केली नाही.

पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी गेल्या महिन्यात संपलेल्या लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावले होते आणि निवडणूक प्रतिज्ञापत्रात 40 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.

तरुण आयएएस अधिका-यावर अनेक आरोपांपैकी एक असा आहे की, जेव्हा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पूजाला तिचे कार्यालय म्हणून वापरण्याची परवानगी दिली, तेव्हा तिने त्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नावाची पाटीही पुण्याच्या कार्यालयात काढून टाकली होती.

यावर दिलीप सांगतात, “पूजाने तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी घेऊनच त्यांची केबिन वापरली होती. तरुण ‘इंटर्न’ आयएएस अधिकाऱ्याला वेगळी केबिन देऊ नये असे कुठे लिहिले आहे का ? असे लिहिले गेले तर मी नोकरीचा राजीनामा देईन.

अपंगत्वाच्या प्रमाणपत्राचा गैरवापर होत असल्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना दिलीप खेडकर म्हणाले की, कोणाचे तरी अपंगत्व ठरवता यावे यासाठी शासन एक मानक ठरवते. त्यांची मुलगी अपंगत्वाशी संबंधित सर्व निकष पूर्ण करते.

नुकतीच पूजा अचानक प्रकाशझोतात आली जेव्हा तिने पुण्यातील पोस्टिंग दरम्यान स्वतंत्र ‘केबिन’ आणि ‘कर्मचाऱ्यांची’ मागणी केली होती, या प्रकरणात तिची पुण्यातून वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. इतकेच नाही तर क्रिमी लेयर (वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी) आणि दृष्टिहीन प्रवर्गांतर्गत नागरी सेवा परीक्षा देऊन आणि मानसिक आजाराचे प्रमाणपत्र सादर करून आयएएसमध्ये स्थान मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.