पुण्यातल्या प्रशिक्षणार्थी आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. प्रोबेशनर असताना ऑडी गाडीतून येणं, दुसऱ्यांची केबिन बळकावणं, अधिकाऱ्यांना त्रास देणं या वर्तनामुळे डॉ. पूजा खेडकर नजरेत आल्या. मागच्या दोन महिन्यांपासून विविध विशेषाधिकारांची त्या मागणी करत होत्या. त्यांच्याकडे स्वत:ची खासगी ऑडी कार आहे. त्यासाठी लाल-निळा दिवा, लेटर पॅड, नेमप्लेट, स्वतंत्र ऑफिस चेंबर आणि स्टाफची मागणी पूजा खेडकर यांनी केली होती. डॉ. पूजा खेडकर यांना अद्याप हे विशेषाधिकार मिळालेले नाहीत, पण तरीही त्या सतत या मागण्या करत होत्या. दरम्यान, आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर यांची पुण्यातून वाशिममध्ये बदली करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
कोण आहे डॉ पूजा खेडकर ?
प्रशिक्षणार्थी आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकरने २०२१ मध्ये यूपीएससी परिक्षा उत्तीर्ण केली. या परिक्षेत तिचा आखिल भारतीय क्रमांक ८२१ होता. तिने स्वत:ला दिव्यांग घोषित केले असल्याची माहिती समोर आली आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयात याचिकाही दाखल केली होती. डॉ पूजाचा युक्तिवाद असा होता की अपंग उमेदवारांना एससी/एसटी उमेदवारांपेक्षा जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांनाही समान लाभ मिळावा.
संपत्ती आणि नियुक्तीचा नेमका वाद काय ?
पूजा खडकरचे उत्पन्न ४२ लाख रूपये इतके आहे. तर संपत्ती १७ कोटी रूपये इतकी आहे. ४२ लाख उत्पन्न असल्यानं ओबीसी प्रवर्गातून आयएएस झाल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ओबीसी प्रवर्गाला वार्षिक 8 लाख रूपयांच्या उत्पन्नाची मर्यादा आहे. पूजाचे उत्पन्न जास्त असल्याने आयएएस नियुक्ती वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
हे आहेत आरोप
आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर यांच्यावर बनावट प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवल्याचा आरोप आहे. आरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी बनावट मागास अपंग प्रमाणपत्र बनवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पूजाने बनावट अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र सादर केले. खेडकर यांनी नागरी सेवा परीक्षा ओबीसी आणि दृष्टिहीन प्रवर्गांतर्गत दिल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांनी मानसिक आजाराचे प्रमाणपत्रही सादर केले होते. अपंगत्व प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी त्यांना एम्स दिल्ली येथे जाण्यास सांगण्यात आले, परंतु त्यांनी कोरोनाचे कारण देत तसे केले नाही. पूजाचे वडील बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाच्या पक्षाचे नेते आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी 40 कोटींचे उत्पन्न दाखवले होते.