ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पाकिस्तान यजमानपद भूषवणाऱ्या या प्रतिष्ठित स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी इंग्लंडने आधीच आपला संघ जाहीर करत आघाडी घेतली आहे. मात्र, इतर 7 संघ अजून आपले खेळाडू जाहीर करायचे आहेत.
टीम इंडिया दुबईत खेळणार सर्व सामने
सुरक्षिततेच्या कारणास्तव टीम इंडिया या स्पर्धेतील सर्व सामने दुबईत खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध टी20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेतील 3 एकदिवसीय सामन्यांना 6, 9, आणि 15 फेब्रुवारीला सुरुवात होईल. या मालिकेला दोन्ही संघांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने निर्णायक मानले जात आहे.
सराव सामन्याचीही तयारी सुरू
मीडिया रिपोर्टनुसार, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी दुबईत सराव सामना खेळणार आहे. हा सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळवला जाईल, याबाबत अजून स्पष्टता नाही. हा सामना आयसीसीकडून आयोजित केला जाणार की बीसीसीआयच्या प्रयत्नांमुळे, याबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही.
टीम इंडियाच्या सामन्यांची वेळापत्रक
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया आपली मोहिम 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध सुरू करणार आहे. यानंतरचा दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे, जो संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेईल. साखळी फेरीतील अंतिम सामन्यात टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होईल.
क्रिकेट रसिकांची उत्सुकता शिगेला
चॅम्पियन्स ट्रॉफीतील टीम इंडियाच्या कामगिरीबाबत क्रिकेट चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. इंग्लंडविरुद्धची मालिका आणि दुबईतील सराव सामना टीम इंडियाच्या तयारीसाठी निर्णायक ठरणार आहेत.