मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ‘मिनी वर्ल्डकप’ म्हणून ओळखली जाते. वनडे वर्ल्डकप गमावल्यानंतर भारतीय संघाकडून या स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केलेल्या आठ संघांना या स्पर्धेत स्थान मिळालं आहे. मात्र, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांनी त्यांचे चमू जाहीर केले असले तरी भारतीय संघाचा अधिकृत संघ जाहीर करण्यात उशीर होत आहे.
बीसीसीआयने आयसीसीकडे अधिक वेळ मागितल्याच्या चर्चा आहेत. संघ जाहीर करण्यात होणाऱ्या या विलंबाचं प्रमुख कारण जसप्रीत बुमराहची दुखापत असल्याचं बोललं जात आहे. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेदरम्यान सिडनीच्या दुसऱ्या डावात बुमराहला पाठिच्या दुखापतीमुळे गोलंदाजी करता आली नाही. त्याला आता नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA)मध्ये रिहॅब प्रक्रियेतून जावं लागणार आहे. बुमराहच्या अनुपस्थितीमुळे कर्णधार रोहित शर्माचं टेन्शन वाढलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील सहभागावर शंका
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बुमराह मार्चच्या पहिल्या आठवड्यात बरा होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानं स्पर्धेतील काही सामने गमावण्याची शक्यता आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत तो खेळणार का, यावर अजूनही साशंकता आहे. बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय गोलंदाजीचं नेतृत्व करताना सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. मात्र, सिडनी कसोटीत झालेल्या दुखापतीमुळे संघाला मोठा धक्का बसला आहे.
दुखापतींमुळे टीम इंडियाच्या संघ निवडीला फटका
दुसरीकडे, अनुभवी मोहम्मद शमीची इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवड झाल्यामुळे आनंदाचं वातावरण आहे. मात्र, फिरकीपटू कुलदीप यादव अजूनही फिटनेसच्या समस्येमुळे संघाबाहेर आहे. तो सध्या एनसीएच्या रिहॅब प्रक्रियेत आहे आणि त्याला अद्याप फिटनेस क्लियरन्स मिळालेला नाही.
हेही वाचा : ‘या’ पायरीवरून मी गाडीत चढू कसा ? एसटी चालकाचा व्हिडीओ व्हायरल
भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मजबूत संघ उभा करायचा असल्याने बुमराह आणि कुलदीपसारख्या खेळाडूंची अनुपस्थिती मोठी कसरत ठरू शकते. क्रीडाप्रेमींना आता संघ जाहीर होण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.