ICC Champions Trophy 2025 : आज, 20 फेब्रुवारी, टीम इंडिया आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघातील संभाव्य प्लेइंग इलेव्हन काय असेल? दुबईतील खेळपट्टी कशी असेल? या दोन्ही बाबींवर क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष आहे.
भारतीय संघ या स्पर्धेत दमदार फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील दारुण पराभवानंतर संघाने जोरदार पुनरागमन केले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत क्लीन स्वीप करत भारतीय संघाने आपल्या ताकदीचे प्रदर्शन केले. संघातील खेळाडू उत्तम लयीत असून, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा एकदा मोठा प्रभाव टाकण्यास सज्ज आहे.
दुबईमध्ये गेल्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावली आहे. आजच्या सामन्यादरम्यानही पावसाची शक्यता असल्याने चाहत्यांमध्ये चिंता आहे. हवामानाचा विचार करता भारतीय संघाचा गोलंदाजीचा प्लॅन महत्त्वाचा ठरणार आहे.
जर हवामान ढगाळ राहिले, तर भारत पेस हवी अटॅक ठेवू शकतो, जिथे मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांच्यात स्थानासाठी चुरस असेल. जर खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असेल, तर रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना संधी मिळू शकते. बांगलादेश संघ गेल्या काही महिन्यांत अडचणीत आहे. संघातील प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे त्यांची ताकद कमी झाली आहे.
शाकिब अल हसनच्या गोलंदाजीवर बंदी आल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी तमीम इक्बालला परत आणण्याचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. डिसेंबर 2024 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 0-3 ने पराभूत झाल्यानंतर बांगलादेश संघ अजूनही त्यातून सावरू शकलेला नाही. कर्णधार नजमुल हुसेन शांतोवर मोठी जबाबदारी असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली संघ भारतासमोर लढा देण्याचा प्रयत्न करेल.
या सामन्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सामना 23 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची तयारी म्हणून पाहिला जात आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध दारुण पराभव पत्करला आहे. त्यामुळे भारतीय संघ जोरदार विजय मिळवून आत्मविश्वास उंचावू इच्छित आहे.