नवी दिल्ली: कोरोना व्हायरसनंतर आता देशात निपाह व्हायसमुळे (Nipah Virus) लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. केरळमध्ये सध्या निपाह व्हायरसचे सहा रुग्ण आढळले असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कोझिकोड जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था २४ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) निपाह व्हायरस कोरोनापेक्षाही धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
निपाह संसर्गामध्ये मृत्यूचे प्रमाण ४०-७० टक्के आहे, तर कोरोनामध्ये ते २ ते ३ टक्के आहे. कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक राजीव बहल म्हणाले की, केरळमध्ये निपाह व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अंतर्गत १००० हून अधिक लोकांचा शोध घेण्यात आला आहे.
हा व्हायरस संक्रमित फळे, वटवाघळांच्या माध्यमातून माणसांमध्ये आणि डुकरांसारख्या इतर प्राण्यांमध्ये पसरू शकतो. जर व्यक्ती कोणत्याही संक्रमित प्राणी किंवा त्याच्या शरीरातील द्रव, जसे की लाळ किंवा मूत्र यांच्या जवळ आल्यास त्यांना संसर्ग होऊ शकतो. एकदा तो लोकांमध्ये पसरला की, हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो, असेही राजीव बहल म्हणाले.
कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी ज्या सुचना होत्या त्याच निपाहपासून बचावासाठी आहेत. वारंवार हात धुणे, मास्क घालणे, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात न येणे, आयसोलेशन यांचा यात समावेश आहे. दरम्यान, भारत निपाह व्हायरसवर उपचार करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे आणखी २० डोस खरेदी करणार आहे.