कानोसा
अमोल पुसदकर
नुकतीच संरक्षण संशोधन व विकास संस्था येथील वैज्ञानिक व संचालक प्रदीप कुरुळकर यांना दहशतवादविरोधी पथकाने पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपाखाली अटक केली. प्रदीप कुरुळकर यांची राष्ट्रवादी विचारांशी बांधिलकी असल्यामुळे त्यांना टीकेचे लक्ष्य बनविण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस व विविध डाव्या विचारसरणीचे वृत्तपत्र करीत आहेत. दहशतवादविरोधी पथक आपले काम करीत आहे. न्यायालय आपले काम करीत आहे. योग्य काळानंतर यातील सत्य समोर येईलच व ते आपल्याला कळेलच. परंतु, कुरुळकर यांना ज्या हनी ट्रॅपमध्ये फसविण्यात आले; तो हनी ट्रॅप काय असतो, हे समजून घेणे आवश्यक आहे.
कुरुळकर हे भारत सरकारच्या एका महत्त्वाच्या विभागात संचालक पदावर कार्य करीत होते. अशा प्रकारची जबाबदारी असणारे अनेक लोक हे समाजमाध्यमांवर उपलब्ध नसतात. परंतु, कुरुळकर हे समाज माध्यमांवर सक्रिय होते ‘हनी ट्रॅप’ या शब्दाचा अर्थ आहे पुरुष असेल तर त्याला एखाद्या महिलेद्वारा अडकविण्याचा सापळा व एखादी महिला असेल तर तिला एखाद्या पुरुषाद्वारे अडकविण्याचा सापळा म्हणजे ‘हनी ट्रॅप.’ आपण समाज माध्यमांवर कोणत्या पोस्ट टाकतो, कोणत्या पोस्ट लाईक करतो, कोणते व्हिडीओज पाहतो यावरून जे अतिविशिष्ट लोक आहेत, त्यांच्याबद्दल सापळा रचणारे अभ्यास करीत असतात की, त्यांची आवड-निवड काय आहे? तुम्ही एका विशिष्ट प्रकारचे व्हिडीओज म्हणजे चित्रफीत पाहात असाल तर तशा पद्धतीच्या चित्रफिती तुम्हाला पाठविण्यात येतात. कुरुळकर यांनासुद्धा झारा दासगुप्ता नावाच्या एका खोट्या अकाऊंटवरून मेसेज आला. त्या मेसेजला त्यांनी उत्तर दिले. पुढे त्या महिलेशी त्यांचा संवाद वाढला. ती त्यांना आपले अश्लील फोटो पाठवायला लागली.
कुरुळकर यांना ती विविध प्रकारची गोपनीय माहिती विचारायला लागली. तिच्या आहारी गेलेले कुरुळकर तिला एक एक गोष्ट सांगायला लागले, अशी माहिती विविध वृत्तपत्रांतून समोर आलेली आहे. सैन्य दलातील काही जवान, काही अधिकारीही अशा अनेक हनी ट्रॅपमध्ये सापडलेले आहेत. नुकताच कुरुळकर यांनी खुलासा केला आहे की, गुप्तचर विभागातील एक अधिकारी या हनी ट्रॅपमध्ये सापडला आहे. अनेक वेळा अधिकारी लोक ज्या महिलेशी व्हॉट्स अॅप किंवा इतर समाज माध्यमांद्वारे संवाद साधतात; बर्याचदा त्या खर्या महिलाही नसतात. कोणीतरी पाकिस्तानी एजंट महिलेचे नाव धारण करून या अधिकार्यांसोबत संवाद साधत असतात. फोटो पाठवताना कुठल्या तरी महिलेचे फोटो स्वत:चे सांगून पाठवीत असतो. अशा अश्लील संवादांची व अर्धनग्न, नग्न फोटोंची या अधिकार्यांना सवय लागून जाते. बरेचदा हे स्वत:चेसुद्धा फोटो भावनेच्या आहारी जाऊन त्या महिलेला पाठवित असतात. याची
वृत्तपत्रामध्ये प्रकाशित माहितीनुसार कुरुळकरांना ही महिला तुम्ही खूप मोठे शास्त्रज्ञ आहात, तुम्ही खूप चांगले काम करीत आहात, मला पाकिस्तानचा खूप राग आहे, मीसुद्धा देशासाठी काही करू इच्छिते, मला तुमच्या संरक्षण क्षेत्रातील गोष्टी समजून घ्यायच्या आहेत… असे म्हणून विविध प्रकारची माहिती विचारीत होती. आपल्या देशातील व्यवस्था अशी आहे की, संशय म्हणून एखाद्या अधिकार्याला अटक केली जात नाही तर त्याच्यावर अनेक महिने पाळत ठेवली जाते. ज्यावेळेस तो गुन्हा करेल त्यावेळेस त्याला अटक केली जाते. वास्तविक पाहता अनेक वेळा हनी ट्रॅपमध्ये अडकलेले अनेक लोक यातून बाहेर निघण्याची इच्छा करतात, परंतु त्यांच्या हातून अशी अनेक कामे झालेली असतात की, ज्यामुळे त्यांना स्वतःला त्यातून बाहेर निघण्याची हिंमत होत नाही. ज्या महिलेशी त्यांचे संबंध आलेले असतात ती महिला त्यांना ब्लॅकमेल करीत असते. कधी ब्लॅकमेल करून तर कधी गोडी गुलाबीने माहिती मिळविली जाते. अशा संवेदनशील विभागात काम करणार्या लोकांनी कामाच्या स्थळी अॅन्ड्रॉईड फोन वापरू नये, अशा पद्धतीचा एक संकेत आहे. अशाफोनवर जर एखादे छायाचित्र कोणी पाठविले व ते छायाचित्र जर तुम्ही डाऊनलोड करून पाहिले तर ज्या ज्या वेळेस तुमचा इंटरनेट सुरू होईल त्या वेळेस तुमच्या मोबाईलशी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा कनेक्ट होईल व तुमच्या जाणते-अजाणतेपणी तुमच्या मोबाईलमधील माहिती, तुमच्या आसपासच्या घडामोडी, आवाज अशा अनेक गोष्टी टिपू शकल्या जातील. कधी कधी या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा तुम्ही ज्या परिसरात काम करत आहात, त्या परिसरातील वायफायशी जर कनेक्ट झाल्या तर त्या वायफायचा उपयोग करणार्या शेकडो कॉम्प्युटर्सवर जे काही चालू आहे तेसुद्धा ते पाहू शकतील किंवा त्यातील माहिती घेऊ शकतील. इतके हे प्रकरण संवेदनशील आहे.
भारत अंतराळ क्षेत्रामध्ये बरीच मोठी कामगिरी करीत आहे. त्यामुळे ते मंगल यान अभियान असेल, अग्नी क्षेपणास्त्र असेल, ब्राह्मोस असेल अशा सर्व क्षेपणास्त्रांबद्दल किंवा भारताच्या अंतराळ कार्यक‘माबद्दल अनेक प्रकारची माहिती ही पाकिस्तानला पाहिजे असते. यासाठी अशा विविध अधिकार्यांना सापळा रचून अडकविण्याचे प्रयत्न केले जात असतात. आपल्या सैन्य दलातील अधिकारी असो वा संरक्षण क्षेत्रात काम करणारे शास्त्रज्ञ; आपल्या देशातील व्यवस्था अशी आहे की, यापैकी कोणाचाही नंबर डायल केला तर ट्रू-कॉलरवर त्याचे नाव दिसून येते. त्यामुळे आपल्या देशातील सैन्य अधिकारी किंवा शास्त्रज्ञ यांची नावे व मोबाईल नंबर हे पाकिस्तानी आयएसआयच्या एजंट यांना सहज उपलब्ध होत असतात. इसरोमधील वैज्ञानिक थंबी नारायण यांना काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे अटक झाली होती. अनेक वर्षांच्या चौकशीनंतर त्यांना दोषमुक्त करण्यात आले. व्यक्ती हा कोणत्याही संघटनेशी संबंधित असो, त्याच्या हातून चूक होऊ शकते, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने ज्या ठिकाणी आपण काम करतो तेथील नियम, कायदे हे पाळायलाच पाहिजे. व्यक्ती हा इंद्रियांचा गुलाम आहे.
या इंद्रियांना भूल पाडण्याचे काम देशाचे शत्रू करू शकतात. त्यामुळे चूक ही चूक आहे, गुन्हा हा गुन्हा आहे, त्याचे समर्थन कोणीही करणार नाही व करण्याचे कारणही नाही. परंतु सैन्य असेल, संरक्षण क्षेत्रातील वैज्ञानिक असतील किंवा इतरही ठिकाणी मोठ्या पदावर काम करणार्या व्यक्ती असतील; या सर्वांनीच या हनी ट्रॅपचा धोका ओळखायला पाहिजे. सर्वसामान्य व्यक्तीला सेक्सटॉर्शनद्वारा अडकविण्याचे काम होऊ शकते. काही कामे ही पैशासाठी होतील, काही कामे गुप्त माहितीसाठी होतील. परंतु सर्वांनी सावध राहणे आवश्यक आहे. आपल्याला फेसबुकवर जी फ्रेंड रिक्वेस्ट रिंकू कुमारी या नावाने येते, ती रिंकू कुमारी एखादी महिला असेल, असे जरूरी नाही. अनेक लोक हे पुरुष असून महिलेच्या नावाचे बनावट अकाऊंट उघडून लोकांना फसविण्याचे काम करीत असतात. ‘पुढच्याच ठेच मागचा शहाणा,’ हे जरी खरे असले, तरी प्रत्येक वेळेला ठेच लागल्यावर शहाणे होणे हे बरोबर नाही. यासाठी हनी ट्रॅपचा धोका आपण ओळखला पाहिजे. त्यानुसार मार्गक‘मण केले पाहिजे, असे वाटते.