चॅटजीपीटी वापरत असाल तर सावधान; एक लाख लोकांचा डेटा हॅक

नवी दिल्ली : चॅटजीपीटी हे एआय सॉफ्टवेअर अल्पवधीतच जगभरात प्रसिद्ध झाले आहे. यामुळे कित्येक लोकांची कामं सोपी झाली आहेत. आता चॅटजीटीपीच्या माध्यमातून अनेक कामे चुटकीनिशी होत असल्याने चॅटजीटीपी वापरणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र जर तुम्हीही चॅटजीटीपी वापरत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे. कारण चॅटजीपीटी वापरणार्‍या एक लाखांहून अधिक लोकांचा डेटा देखील हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे.

ग्रुप-आयबी नावाच्या एका सायबर टेक्नॉलॉजी कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. ही सिंगापूरमधील कंपनी आहे. या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, चॅटजीपीटी यूजर्सचा डेटा ऑनलाईन विकला गेला आहे. या कंपनीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, की जगभरातील एक लाखांहून अधिक लोकांचा डेटा हॅक करण्यात आलेला आहे. यामध्ये सर्वाधिक यूजर्स हे भारतातील असल्याचंही या कंपनीने सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील १२,६३२ अकाउंट्सचा डेटा हॅक झाला आहे.

भारतीयांच्या चोरलेल्या माहितीची डार्क वेबवर विक्री करण्यात आली. या प्रकरणामुळे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर नियंत्रणाची गरज असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. काही दिवसांपूर्वीच इलॉन मस्क, सॅम अल्टमन अशा कित्येक टेक दिग्गजांनी एआयवर निर्बंध लागू करण्याची मागणी व्यक्त केली होती. तर, युरोपियन युनियनने देखील काही दिवसांपूर्वी एआय कायदा समोर आणला होता.