जळगाव : वाळू वाहतुकीतील पैशांच्या अंतर्गत वादातून पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली गावातील 40 वर्षीय वाळू व्यावसायीक सचिन उर्फ सोनू देविदास पाटील (40, अंतुर्ली नं.3, ता.पाचोरा) याचा कासोदा पोलिस ठाणे हद्दीत निर्घृण खून करण्यात आला होता. पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करून खून प्रकरणी दोघा आरोपींना रविवारी रात्री उशिरा अटक केली असून सोमवारी न्यायालयाने त्यांना 25 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. शुभम ज्ञानेश्वर पाटील (24, गिरड, ता.भडगाव) व समाधान सुधाकर पाटील (29, वेरूळ खुर्द, ता.पाचोरा) अशी अटकेतील आरोपींची नावे असून मुख्य संशयित निलेश देसले याच्यावर पोलिस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत.
अपघात घडवून क्रुरपणे केली हत्या
सचिन उर्फ सोनू देविदास पाटील (40, अंतुर्ली नं.3, ता.पाचोरा) हा तरुण आपल्या बुलेटवरून कासोदा पोलीस ठाणे हद्दीतील गिरणा नदी काठी रविवारी सकाळी पहाटेच्या सुमारास आल्यानंतर ख्वॉजा मिया दर्ग्याजवळ चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक देत तरुणाला फटफटत नेण्यात आले व त्यानंतर आरोपींनी तरुणावर शस्त्रांनी छातीवर, मानेवर व बरगड्यांवर सपासप वार केल्याने तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने त्याचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी किरण पाटील यांच्या फिर्यादीनुसार रविवारी रात्री निलेश ज्ञानेश्वर देसले (गिरड, ता.भडगाव), शुभम ज्ञानेश्वर पाटील (24, गिरड, ता.भडगाव), समाधान सुधाकर पाटील (29, वेरूळ खुर्द, ता.पाचोरा) व अन्य एका अनोळखीविरोधात खुनासह कटाचा गुन्हा कासोदा पोलिसात दाखल करण्यात आला.
दोघा आरोपींना रात्रीच अटक
खून प्रकरणी कासोदा पोलिसांनी रविवारी शुभम ज्ञानेश्वर पाटील (24, गिरड, ता.भडगाव), समाधान सुधाकर पाटील (29, वेरूळ खुर्द, ता.पाचोरा) या दोघा आरोपींना अटक केली असून सोमवारी त्यांना एरंडोल न्यायालयात हजर केले असता 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, मुख्य संशयित निलेश देसले याच्या पायाचे ऑपरेशन झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून डिस्जार्ज मिळताच त्यास अटक केली जाणार आहे तर संशयितावर पोलिसांनी नजर ठेवली आहे. अधिक तपास कासोदा सहाय्यक निरीक्षक निता कायटे करीत आहेत.