नवी दिल्ली : जगातील प्रमुख अवकाश संशोधन संस्थांमध्ये इस्रोची गणना होते. कित्येक कठीण स्पेस मिशन यशस्वीपणे पार पाडण्याचा विक्रम इस्रोच्या नावावर आहे. चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पूर्ण करणं आणि आदित्य एल-1 मोहिमेचं यशस्वी लाँचिंग यामुळे इस्रो जगभरात चर्चेत आहेत. मात्र, भारताच्या या अवकाश संशोधन संस्थेमध्ये आयआयटी (IIT) मधील एक टक्का विद्यार्थी देखील येत नसल्याचं समोर आलं आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी ही गोष्ट सांगितली आहे.
एशियानेट या वृत्तसंस्थेला मुलाखत देतांना एस.सोमनाथ म्हणाले की, भारतातील टॉप इंजिनिअर्स हे आयआयटीमधून बाहेर पडतात. मात्र, त्यांना इस्रोमध्ये काम करण्यात रस नाही. अवकाश संशोधन हे महत्त्वाचं क्षेत्र आहे असा विचार करणारे लोक इस्रोमध्ये येतात. मात्र, असा विचार करणारे एक टक्क्याहून कमी विद्यार्थी आहेत, असंही सोमनाथ म्हणाले.
सोमनाथ यांनी सांगितलं, की याचं सगळ्यात मोठं कारण पगार हे आहे. यावेळी त्यांनी एक अनुभव देखील सांगितला. इस्रोची टीम एकदा कॅम्पस प्लेसमेंटसाठी आयआयटीमध्ये गेली होती. त्यावेळी इस्रोमधील संधी आणि कामाची पद्धत विद्यार्थ्यांनी ऐकून घेतली. मात्र, जेव्हा सॅलरी स्ट्रक्चर सांगण्यात आलं, तेव्हा तेथील निम्म्याहून अधिक विद्यार्थी उठून निघून गेले.
एका माहितीनुसार, इस्रोमध्ये इंजिनिअर्सचा सुरुवातीचा पगार साधारणपणे 56,100 रुपये प्रति महिना एवढा आहे. तर इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ यांचा पगार 2.5 लाख रुपये महिना एवढा आहे. आयआयटीमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना सरासरी मिळणारा पगार हा इस्रोच्या चेअरमन यांच्या पगाराएवढा आहे. त्यामुळेच आयआयटीमधून बाहेर पडणारे विद्यार्थी इस्रोऐवजी मोठे पॅकेज देणाऱ्या कंपनीची निवड करतात.