---Advertisement---
जामनेर : तालुक्यातील पळासखेडा बु., येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजकुमार प्रकाशचंद कावडीया यांच्यावर गुरुवारी (२८ ऑगस्ट ) रोजीच्या दंडात्मक आदेशानुसार एकूण ५ कोटी ४ लाख १८ हजार ५८० रुपयांचा वाळू व मुरूमचा अवैध वापर व साठवणूक केल्याबाबत दंडात्मक आदेश पारित करण्यात आला आहे.
या आदेशानुसार, प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेने पळासखेडा बु. येथील शासकीय गट नं. ८२/१/१, ८२/१/२, ८६/२/१, ८६/२/२ या जागेवर अनधिकृत निवासी संकुल, फिजिओथेरपी इमारत, मुलींचे वसतिगृह, जलतरण तलाव व चेंजिंग रूमअशा विविध बांधकामांची उभारणी केली होती. या बांधकामांसाठी वापरण्यात आलेल्या गौणखनिजाची उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग जामनेर यांच्या कडील तांत्रिक पडताळणी अहवालानुसार २ हजार १४६ ब्रास मुरुम आणि १ हजार ६२ ब्रास वाळू असे एकूण ३ हजार २०८ ब्रास गौण खनिज विनापरवाना वापरल्याचे निष्पन्न झाले आहे.
या तांत्रिक पडताळणी अहवालानुसार संबंधित संस्थेस नोटीस देऊन वाजवी संधी देऊन देखील त्यांनी खुलासा मुदतीत सादर केला नाही. ही कारवाई महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम ४८ (७) व ४८ (८) आणि महाराष्ट्र गौण खनिज (विकास व विनियमन) नियम, २०१३ मधील तरतुदींनुसार करण्यात आली आहे. दंडाची ही रक्कम आदेश प्राप्त झाल्यापासून ७ दिवसांच्या आत शासनाकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.अन्यथा सदरची रक्कम ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १७६ ते १८४ नुसार सक्तीने वसूल केली जाणार आहे. या कारवाईमुळे अवैध बांधकामे आणि गौण खनिजांच्या गैरवापराला आळा बसणार आहे.