गाडीवर जय श्री राम अन् गाडीमधून गुरांची अवैध वाहतूक

तरुण भारत लाईव्ह । चोपडा : “जय श्री राम” लिहलेल्या पिकअप गाडीमधून गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांवर चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहरातील आशा टॉकीज भागातून गुरांना कत्तलीसाठी नेत असताना शहरातील गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही गाडी पकडली. त्यानंतर गाडीचालक व क्लिनरवर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सविस्तर वृत्त असे कि, हातेड फाट्यावर पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर व चोपडा ग्रामिण पोलीस ठाण्याचे पोलीस हे बंदोबस्त करीत असताना चोपड्याकडे भरधाव वेगात जाणारी पिकअप गाडी आली. ही गाडी थांबवण्याची सूचना पोलिसांनी केली. तरीही गाडी थांबली नाही. म्हणून तिचा पाठलाग करून ती गाडी चोपडा शहरातील आशा टॉकीज भागात शहरातील गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने पकडली. या गाडीत अवैधरित्या नऊ गोरे कोंबून भरलेले आढळून आले. यावेळी गाडीचे चालक व क्लीनर यांना पोलिसांनी विचारले असता हे गोरे आम्ही कत्तलीसाठी सवुद सलीम कुरेशी (रा. चोपडा ) यांना देणार असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

यानंतर चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंगाणे यांच्या फिर्यावरून गाडी चालक अनुराग गंगाराम चव्हाण (वय २०) वय व सुशील संपत पवार (वय २१) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेु. गुन्ह्याचा तपास एएसआय किशोर शिंदे करीत आहे.

 

गाडीवर “जय श्री राम”

पीकअप गाडीवर ‘जय श्री राम’ असे मोठ्या अक्षरात लिहिले होते. ‘जय श्रीराम’ लिहिल्यावर आपली गाडी कोणी अडविणार नाही, असा आरोपींचा समज होता. गाडीत 9 गुरांना अमानुषपणे कोंबले होते. पोलिसांनी एकूण 90 हजारांची गोरे व 2 लाख किंमतीची गाडी असा एकूण 2 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोरे चोपडा शहरातील रामगोपाल गो शाळेत सोडण्यात आले आहेत.