IMD कडून शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, जळगावात पावसाचा अंदाज

जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात तापमानात बदल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असून, थंडीचा कडाका गायब झाला आहे. जळगावातील दिवसाचा पारा ३२ ते ३४ अंशांपर्यंत पोहोचला. यामुळे उन्हाची चालून लागली आहे. त्याचवेळी हवामान विभागाने चिंता वाढवणारी बातमी दिली आहे. राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. यात आगामी दोन दिवस जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.

त्यामुळे जिल्ह्यात आगामी काही दिवस दिवसाच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागराकडील भागात कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले आहे. त्यामुळे दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे रब्बी पिकांचे नुकसान होणार आहे. अवकाळी पावसामुळे रब्बीतील गहू, काढणीला आलेला हरभरा, तूर पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात ४० ते ५० टक्के पावसाची शक्यता आहे. काही तालुक्यांमध्ये ठराविक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. पाऊस झाला नाही तरी मात्र ढगाळ वातावरण आगामी काही दिवस कायम राहू शकते. मात्र, त्यानंतर तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मार्च महिन्यात पुन्हा अवकाळीची परिस्थिती निर्माण होऊ शकते