जळगाव । यंदा राज्यात मॉन्सूनने सरासरी न गाठता निरोप घेतला. परतीच्या पावसाने देखील अनेक ठिकाणी पाठ फिरविल्याने कमी मॉन्सून झाल्याचा फटका यंदा बसणार आहे. यातच ऑक्टोबर हिटच्या तडाख्यानंतर आता राज्यात तापमानाचा पारा घसरला असून थंडीची चाहूल लागली असतानाच राज्यावर अवकाळीचं संकट येऊन ठेपल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.
हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला असून राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजाची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांनी खरीप हंगामातील पीके झाकून ठेवण्यासाठी शेताकडे धाव घेतली.
मागील काही दिवसापासून राज्यातील वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. राज्यात तापमानाचा पारा घसरला असून राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पीके काढणी सुरु असून त्यातच अवकाळीचं संकट येऊन ठेपले आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शेतकऱ्यांनी खरीप पीकांची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील हवामान खात्याने केलं आहे.
आज म्हणजेच बुधवारी पहाटेच्या कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाकडून वर्तवली गेली आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. तर, उर्वरित राज्यात काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याने थंडी कमी जाणवणार आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात १० नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान, तुरळक पावसाचे संकेत हवामान खात्याकडून वर्तविण्यात आले आहे.